IMPIMP

Arvind Kejriwal On Modi Govt | पुन्हा मोदी सरकार आले तर उद्धव ठाकरेंसह इतर नेते तुरूंगात असतील, केजरीवालांचा खळबळजनक दावा, सिंचन घोटाळ्याबाबत म्हणाले…

May 11, 2024

पुणे : Arvind Kejriwal On Modi Govt | पंतप्रधान मोदी हे एक राष्ट्र, एक नेता मोहीम राबवत आहेत. मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व विरोधकांना संदेश दिला. जर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना आम्ही तुरुंगात टाकू शकतो, तर ४ जून रोजी सत्ता आली तर देशातील कोणत्याही नेत्याला आम्ही तुरुंगात टाकू शकतो. जर भाजपाची सत्ता आली तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि इतर विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

तिहार तुरुंगातून (Tihar Jail) जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल प्रथमच पक्षाच्या मुख्यालयात जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपा आणि मोदींवर अनेक आरोप केले.

अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपाने एका वर्षात आम आदमी पक्षाचे चार मोठे नेते तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदींनी आप पक्षाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. मला तुरुंगात टाकून मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. पण त्यांनी स्वतःच्या पक्षातच देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोरांना आश्रय दिला.

सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले, ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिले आणि म्हणतात मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायची असेल तर मोदींनी केजरीवालांकडून शिकावे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, विरोधी पक्षच नाही तर भाजपाने स्वतःच्या नेत्यांनाही संपविले. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, लालकृष्ण आडवाणी यांच्यासारखे अनेक नेते त्यांनी संपविले. लोकसभेत विजय मिळू द्या, दोन महिन्यात ते उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांनाही संपवतील.

अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपाचे लोक इंडिया आघाडीला प्रश्न विचारतात की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? पण मी भाजपाला प्रश्न विचारतो की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल.

भाजपाला सवाल करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले गेले. मग आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?

Sharad Pawar | भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले – शरद पवार