IAS Puja Khedkar | पूजा खेडकरची ‘लाल दिव्याची’ गाडी अखेर पोलिसांच्या ताब्यात
पुणे: परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. दरम्यान खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने त्या चर्चेत आहेत.
खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित केला होता. खेडकर ३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. याठिकाणी त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्या, खेडकर यांच्या वडिलांनी पूजा यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याबाबत सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना अयोग्य शब्दप्रयोग वापरणे, अपर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खासगी दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून तेथे स्वतःचे कार्यालय स्थापन करणे आदी प्रकार केले. त्यातून या प्रकरणाला वाचा फुटली
पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रसरकारने एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एका अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणुकीबाबतचा तपशीलवार अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविला आहे. हा अहवाल राज्य शासनाकडून केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान पूजा खेडकर यांची लाल दिव्याची गाडी अखेर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुणे आरटीओने ही कार ज्या कंपनीच्या नावावर आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी केली होती. आरटीओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पुणे आरटीओने गुरुवारी संध्याकाळी एका खासगी कंपनीला नोटीस बजावली. कार क्रमांक MH-12/AR-7000 ही कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती. नोंदणी केलेल्या वापरकर्त्याचा पत्ता हवेली तालुक्यातील शिवणे गाव असा देण्यात आला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तपास करता यावा यासाठी कंपनीला नोटीसमध्ये कार पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुणे आरटीओने आपल्या फ्लाइंग स्क्वॉडला कारचा शोध घेण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांना ही कार सापडली आहे.
Comments are closed.