IMPIMP

Illegal Hoardings In Pune | तब्बल 110 बेकायदा जाहिरात फलक लावणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिकेचा पोलिसांकडे पाठपुरावा

December 31, 2024

पुणे : Illegal Hoardings In Pune | शहरातील बेकायदा फलक आणि होर्डींग्ज लावणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी पोलिसांना (Pune Police) ११० पत्र पाठविली आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर हे गुन्हे दाखल करावेत, याबाबत पोलिस आयुक्तांकडे (Pune CP) पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P) यांनी दिली.

    महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation - PMC) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वच विभागाची टीम एकाचवेळी रस्त्यावर उतरून स्वच्छता, अतिक्रमण हटविणे तसेच बेकायदा जाहिरात फलक होर्डींग्ज व त्यासाठी उभारण्यात आलेले सांगाडे काढण्याचे काम करत आहे. काही भागात ही कारवाई झाल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी खांबांवर आणि चौकांमध्ये पुन्हा जाहिरात फलक लावले जात असून विद्रुपीकरण केले जात आहे.  या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

   यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बेकायदा जाहिरात फलकांसंदर्भातील खटल्यामध्ये बेकायदा फलक लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामध्ये स्थानीक स्वराज्य संस्थांसोबतच पोलिसांना देखिल पार्टी करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये बेकायदा जाहिरात फलक लावल्याबद्दल संबधितांवर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिली आहेत. अशी तब्बल ११० प्रकरणे आहेत. परंतू पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत आहे. पोलिसांनी महापालिकेच्या पत्रानुसार संबधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलिस आयुक्तांसोबत महापालिकेचा पत्र व्यवहार सुरू असल्याची माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.