IMPIMP

Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला, 18 जून पर्यंत कामकाज स्थगित

June 12, 2024

पुणे : – Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Porsche Car Accident Pune) अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. बुधवारी (दि.12) आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात (Juvenile Justice Board-JJB) हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल असे सांगत कामकाज स्थगित केले. त्यामुळे अल्पवयीन मुलाला 18 जून पर्यंत बाल सुधारगृहातच राहावे लागणार आहे.

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला 12 जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला होता. ही मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळात दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe) यांनी हा अर्ज केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश आज (बुधवार) सुनावणीदरम्यान उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. त्यामुळे मी नियमित न्यायाधीश नसल्यामुळे अल्पवयीन आरोपी बाबतचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल, असं म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केले. त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचा मुक्काम 18 जूनपर्यंत वाढला आहे.

सुनावणी दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला आणखी 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती बाल न्याय मंडळाकडे केली. यावेळी पोलिसांनी अशी मागणी केली की, तपास सुरु आहे. मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परिणाम करेल. बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पूर्ण व्हायचे आहे. त्यासाठी त्याला इथेच ठेवावे. मुलाच्या घरी त्याची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्या जीवाला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला सुधारगृहातच ठेवण्यात यावे.