Ladki Bahin Yojana | पुण्यात चारचाकीवाल्या 75 हजार लाडक्या बहिणी! आता पडताळणी करून घेणार हा निर्णय, प्रशासनाकडे आली यादी

पुणे : Ladki Bahin Yojana | विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळी कोणतेही निकष न तपासता सरसकट 1500 – 1500 रुपयांचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींनी महायुतीच्या भावांना भरघोस मतदान केले. आता सरकार स्थापन झाल्यानंतर भावांनी निकष काटेकोरपणे तपासण्यास सुरूवात केल्याने अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, अशा बहिणींना योजनेतून वगळण्यात येणार आहे, त्यानुसार फक्त पुण्यातच 75 हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. पुण्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी 21 लाख 11 हजार 991 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी 20 लाख 89 हजार 946 बहिणींना लाभ मिळाला. आता या लाभार्थी बहिणींपैकी 75 हजार 100 बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे समोर आले आहे.
राज्य शासनाच्या प्रत्येक परिवहन विभागाने ही यादी जिल्हाधिकार्यांना पाठवली आहे. या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन याबाबतची पडताळणी करणार आहेत.
पुणे जिल्ह्यासाठीच्या दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत. यामधील पहिल्या यादीत 58 हजार 350, तर दुसर्या यादीत 16 हजार 750 अशी एकूण 75 हजार 100 वाहनधारक बहिणींची नावे आहेत. आता तालुकानिहाय पडताळणीचे काम तत्काळ सुरू होईल. पडताळणीत बहिणीकडे चारचाकी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.