Pune Crime Court News | पुणे : मित्राच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

पुणे : Pune Crime Court News | पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हिंजवडी, पुणे आरोपींचा मित्र मयत गणेश रामदास पिंजन वय- ३२ याच्या खुनाचा आरोप असलेले नवनाथ प्रभाकर शेडगे वय-३५ व श्रुषीकेश पांडुरंग भिंताडे वय-३७ सर्व रा. कासारसाई, ता. मुळशी जि. पुणे यांची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली.
खटल्याची हकीकत थोडक्यात-
दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी मयत गणेश पिंजन याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. फोन गणेशच्या मुलीने घेतला. त्यावर गणेश आहे का? अशी विचारणा मोबाईलवर बोलणार्या व्यक्तीने केली. गणेशच्या ८ वर्षाच्या मुलीने त्या व्यक्तीला सांगितले पपा बाहेर आहेत. त्या दिवसा पासून गणेश घरी आलाच नव्हता. गणेशचा भाऊ दिनेश पिंजन याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी शेडगे व भिंताडे या दोघांनी कुठल्या तरी अज्ञात कारणांवरून भाऊ गणेश पिंजन याचा खुन केला अशी फिर्याद दिली.
सरकार पक्षाने सत्र न्यायालयात एकूण १३ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. मयत गणेश, आरोपी शेडगे व भिंताडे हे घटनेच्या दिवशी एकाच रिक्षातून जाताना पाहिले असल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष देताना सांगितले. सुनावणी दरम्यान आरोपींना साक्षीदारांनी न्यायालयातही ओळखले होते. आरोपी भिंताडे याने ज्या फळीने गणेशला मारले ती फळी जप्त केल्याचे पोलीस फौजदार तपासी अंमलदार यांनी न्यायालयात साक्ष देताना सांगितले.
आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार (Adv Milind Pawar) व अॅड. पंडित धुमाळ यांनी युक्तिवाद केला. जरी साक्षीदारांनी गणेश व आरोपी यांना घटनेच्या दिवशी एकाच रिक्षातून एकत्र जाताना पाहिले असले व श्रुषीकेश भिंताडे कडून फळी जप्त केली असली तरी त्या पुराव्याच्या आधारावर आरोपींनीच खुन केला हे सिद्ध होत नाही. कारण गणेश व आरोपी हे एकमेकांचे जुने मित्र होते. एखादी व्यक्ती गाडीवरून घसरून पडली किंवा खडकावर घसरून पडला तरी अशा प्रकारच्या जखमा ज्या जखमा मयत गणेशच्या शरिरावर होत्या. तशा जखमा घसरून पडल्याने सुध्दा होऊ शकतात असे शव-विच्छेदन करणार्या डाॅक्टरांनी उलट-तपासात साक्ष देताना न्यायालया समोर मान्य केले आहे. त्यामुळे आरोपींनीच गणेशचा खुन केला असे म्हणता येणार नाही. फक्त संशयावरून आरोपींना हिजवडी पोलीसांनी अटक केली असून प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार सरकार पक्षाला न्यायालया समोर आणता आलेला नाही.
गणेश पिंजन हा कुठेतरी घसरून पडला असावा, त्याला जखमा झाल्या असाव्यात, त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा युक्तीवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. संशयाचा फायदा हा आरोपीलाच द्यावा लागतो असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने केला. आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून संशयाचा फायदा देत दोघांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात अॅड. अक्षय शिंदे, अॅड. हर्षवर्धन पवार यांनी मदत केली.
Comments are closed.