Pune Crime News | जुन्या भांडणाच्या वादातून दुकानात शिरुन शस्त्राने युवकावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, वाघोली पोलिसांनी दोघांना केली अटक

Pune Crime News | A man entered a shop and tried to kill a young man with a weapon due to an old dispute, Wagholi police arrested two

पुणे : Pune Crime News | जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी दुकानात शिरुन युवकावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर, पायावर, मांडीवर, चेहर्‍यावर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Wagholi Police)

आकाश राजू बनसोडे (वय २०, रा. बाएफ रोड, वाघोली) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत ज्ञानोबा जाधव (वय १८, रा. उबाळेनगर) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल चव्हाण (वय २१), अनिकेत वानखेडे ऊर्फ अंड्या (वय १९, दोघे रा. तुळजाभवानीनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार उबाळेनगर येथील यु मेन्स वेअर या दुकानात ३ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बनसोडे आणि विशाल चव्हाण, अनिकेत वानखेडे यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. त्याचा या दोघांना राग होता. आकाश बनसोडे आणि ज्ञानोबा जाधव हे दुकानात ग्राहकांना कपडे दाखवत होते. त्यावेळी तिघे जण अचानक दुकानात शिरले. त्यांनी आकाश याला थांब तुझा आज गेमच करतो, असे म्हणून लोखंडी हत्याराने त्याच्या डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठाजवळ, पायाच्या मांडीवर सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघे पळून गेले होते. आकाश बनसोडे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक चंदन विजय तपास करीत आहेत.