Pune Crime News | भांडण लावल्याच्या संशयावरुन पितापुत्रांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

पुणे : Pune Crime News | बारशाच्या कार्यक्रमात जेवणासाठी लोक कमी आल्याने शिल्लक जेवण त्यांनी परस्पर वाटून टाकले. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे झाली. ही भांडणे लावल्याच्या संशयावरुन पितापुत्राने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
याबाबत संदीप कदम (वय ३२, रा. आदर्शनगर, लोहगाव) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजु मोरे (वय ५०, रा. औंध रोड) याला अटक केली आहे. त्यांचा मुलगा ऋतिक मोरे (रा. औंध रोड) व इतर दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रेंजहिलमधील दुर्योधन भापकर यांच्या कार्यालयासमोर ११ जून रोजी सायंकाळी पावणेसात वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कदम हे दुर्योधन भापकर यांच्या कार्यालयात सुपरवायझर म्हणून काम पहातात. त्यांचा मित्र राजू मोरे यांच्या पाहुण्याच्या लहान मुलाचे बारशाचा कार्यक्रम हे जीवन प्रकाश हेल्थ क्लब येथे होता. या कार्यक्रमाचे जेवणाचे केटरर्स राजू मोरे यांनी त्यांचे दुसरे मित्र राजू नायक यांना दिले होते. राजू नायक यांनी २०० जणांचे जेवण बनविले होते. परंतु त्या ठिकाणी ९० जण जेवण करण्यास आले. त्यामुळे कार्यक्रमातील ११० जणांचे जेवण उरले होते. हे जेवण राजू नायक या केटरर्स यांनी परस्पर कोणालातरी वाटून टाकले. त्यामुळे जेवण वाटण्यावरुन राजू मोरे व राजू नायक यांच्यामध्ये वादावादी झाली होती. ही वादावादी सुरु असताना संदीप कदम हे त्या ठिकाणी थांबून होते.
राजू नायक याला संदीप कदम याने फितरल्यामुळेच त्याने वाद घातला असा गैरसमज राजू मोरे याने करुन घेतला. त्याचा राग मनात धरुन ते बुधवारी पावणे सात वाजता भापकर यांच्या कार्यालयाबाहेर आले. राजू मोरे, त्यांचा मुलगा ऋतिक मोरे व इतर दोघांनी त्यांना कार्यालयाबाहेर बोलावून घेतले. “तू कशाला आमचे दोघांमध्ये तोंड खुपसतो, तुला आज जिवंत सोडणार नाही,” असे बोलून राजू मोरे याने कोयत्याने त्यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूला वार करुन गंभीर जखमी केले. ऋतिक मोरे याने त्यांना पकडून ठेवले. इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संदीप कदम यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याने त्यांना तातडीने खडकी कॅन्टोंमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
खडकी पोलिसांनी राजू मोरे याला अटक केली असून न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले तपास करीत आहेत.
Comments are closed.