Pune Crime News | सोन्याचे दागिन्याचे पार्सल पोहचविण्यास आलेल्या डिलिव्हरी बॉयला पिस्तुल लावून दोघा चोरट्यांनी लांबविला 69 लाखांचा ऐवज

पुणे : Pune Crime News | मुंबईतून पुण्यातील शाखेत सोन्याचे दागिने जमा करण्यास आलेल्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या कमेरला पिस्तुल लावून त्याला मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचे ८ पार्सल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेले. (Robbery Case)
याबाबत अंबे एक्सप्रेस लॉजेस्टिक कंपनीचे मॅनेजर प्रथमेश माने (वय २८, रा. अंधेरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोर बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठारी आणि कोठारी कंपनीच्या मुंबई शाखेतून ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले ८ पार्सल पुण्यातील शाखेत पोहचविण्यासाठी अंबे एक्सप्रेस लॉजेस्टिक कंपनीकडे देण्यात आले होते. कंपनीचा कर्मचारी हे पार्सल घेऊन मुंबईहून रेल्वेने पुण्यात आला. तो पुणे रेल्वे स्टेशनला उतरुन स्टेशन बाहेर आल्यानंतर त्याच्या कमरेला दोघा जणांनी पिस्तुल लावले. त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ८ पार्सल जबरदस्तीने काढून घेतले. घाबरलेल्या या कर्मचार्याने ही बाब मॅनेजर प्रथमेश माने यांना कळविली. ते तातडीने पुण्यात आले. त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळील सीसीटीव्हीमध्ये या कर्मचार्याच्या शेजारी दोघे जण दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
Comments are closed.