Pune Crime News | स्वत:च्या दुकानावर दरोडा टाकणारा सराफ सुवर्ण भिशी योजनेतील 42 लाख रुपयांची फसवणूक करुन फरार;नर्‍हेतील श्री ज्वेलर्स सराफी पेढीतील प्रकार

Pune Crime News | Jeweler who robbed his own shop absconds after defrauding Rs 42 lakh from Suvarna Bhishi scheme;

पुणे : Pune Crime News | आपल्याच नातेवाईकाला साथीदारांच्या मदतीने सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा बनाव घडवून आणणारा सराफ विष्णु दहिवाल याने सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ जणांची ४२ लाख रुपये व २१ तोळे सोने घेऊन फरार झाला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दखल केला आहे. (Cheating Fraud Case)

श्री ज्वेलर्स या सराफी पेढीचा मालक विष्णु सखाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती विष्णु दहिवाळ (रा. रायकरमळा, धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा ४२ लाख रुपयांचा फसवुणकीचा  गुन्हा दाखल झाला असला तरी त्याने धायरी, नर्‍हे परिसरातील लोकांना व व्यापार्‍यांना ५ ते ६ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे सांगितले जात आहे.

धायरीत दहिवाळ याची श्री ज्वेलर्स सराफी पेढी आहे. दहिवाळ याने सुवर्ण भिशी योजना जाहीर केली होती. फिर्यादी आणि त्याच्या पत्नीने सुवर्ण भिशी योजनेत १ लाख ३० हजार रुपये गुंतविले होते. तक्रारदाराने १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडले. मोडीतून आलेले एक लाख ९ हजार रुपये, तसेच आणखी एक लाख रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरुपात दहिवाळ याच्याकडे दिले होते. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून ३ लाख ३९ हजार रुपये जमा केले होते. २५ मे रोजी फिर्यादी सराफी पेढीत गेले. तेव्हा सराफी पेढी बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी चौकशी केली. तेव्हा दहिवाळ दाम्पत्य पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. फिर्यादीसह ३६ जणांनी दहिवाळ याच्या सुवर्ण भिशी योजनेत पैसे गुंतविले होते. दहिवाळ दाम्पत्याने एकूण मिळून ४२ लाख ७८ हजार रुपये, तसेच २१ तोळे सोन्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

यापूर्वी १५ एप्रिल रोजी विष्णु दहिवाळ याने आपल्या चुलत भावाला हाताशी धरुन बनावट पिस्तुल वापरुन दरोडा पडल्याचे भासविले होते. नांदेडसिटी पोलिसांनी दरोडा टाकलेल्यांना पकडल्याने आपल्या दुकानावर दरोडा टाकण्याची व बनावट दागिने चोरुन नेण्याची योजना विष्णु दहिवाळ यानेच केल्याचे निष्पन्न झाले होते.

आपण कर्जबाजारी झाल्याने देणेकर्‍यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आपणच चुलत भावाच्या मदतीने दरोडा टाकण्यास सांगितल्याची कबुली विष्णु दहिवाळ याने दिली होती.

याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे (Nanded City Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले की, विष्णु दहिवाळ याने दरोड्याची दिलेली फिर्याद खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यातील ४ पैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला होता. या आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे त्यानंतर विष्णु दहिवाळ हा फरार झाला आहे.