Pune News | पुणे पोलीस दलाचा उपक्रम आता बीडमधील शाळांमध्ये राबविला जाणार
पुणे : Pune News | शालेय जीवनात मुलांना चुकीचा मार्ग दिसला तर त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. ते गुन्हेगारी वृत्तीकडे वळण्याचा धोका असतो. अशा मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे समुपदेशनाचे काम पुणे पोलीस (Pune Police), आर. के. बहुउद्देशीय संस्था, इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) यांच्या वतीने पुणे शहरातील शाळांमध्ये केला जात आहे. आता हाच उपक्रम बीडमधील शाळांमध्ये राबविण्यात आला आहे.
शिक्षण दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सेंट जेवियर स्कुलमधील माध्यमिक शाळेतील मुलांमुलीशी आर के बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव भाग्यश्री साळुंके यांनी संवाद साधला.
समाजामध्ये सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे व व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या आयुष्यावर व शालेय जीवनावर चुकीचा परिणाम होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुले चुकीच्या मार्गाकडे जाताना दिसत आहे. या मुलांना पुन्हा मार्गावर आणणे व त्यांच्या सर्वागिण विकासासाठी समुपदेशचा उपक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाने आर के बहुउद्देशीय संस्था, इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि पुणे पोलीस यांच्या वतीने पुणे शहरातील शाळांमध्ये राबविला जात आहे.
भाग्यश्री साळुंके यांनी मुलांशी संवाद साधताना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, गुड टच -बॅड टच, मुलींचे सक्षमीकरण, पालकांचे समुपदेशन आणि विविध खेळांच्या माध्यमातून मुली आणि त्यांचे पालक म्हणून उपस्थित असलेल्या आई यांना मार्गदर्शन आणि या विषयाची गंभीरता याबाबी गोष्टीच्या रुपात समजावून सांगितल्या.
संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंके, शुभम रांजणे यांनी मुलांना करियर मार्गदर्शन, स्वावलंबन, निर्भयपणा, आत्मविश्वास व आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी करावयाचे स्वत:मधील बदल, वर्तमानपत्र वाचन, लेखन आणि संवाद याचे फायदे, पर्यावरण संरक्षण, लैंगिक शिक्षण यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सेंट जेवियर स्कुलचे मुख्याध्यापक फादर पीटर खंडागळे, भाग्यश्री साळुंके, आनंद साळुंके, शुभम रांजणे आणि शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.