Pune PMC News | आणखी एका बळीनंतर गंगाधाम चौकातील तीव्र उतार कमी करण्याच्या कामाची निविदा अखेर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे

पुणे : Pune PMC News | कोंढव्याकडून गंगाधाम चौकाकडे (Kondhwa To Gangadham Road) येणार्या रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्यासाठी पथ विभागाने काढलेली निविदा अखेर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविली आहे. मागील वर्षी या उतारावर डंपरच्या धडकेने एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पथ विभागाने या रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्याचे जाहीर केले होते.
गंगाधाम चौकात पीपीपी तत्वावर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्यात येणार आहे. या कामाची वर्क ऑर्डर दिली असली तरी उड्डाणपूल बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर करायचा की कोंढवा ते मार्केटयार्ड रस्त्यावर करायचा यावरून लोकप्रतिनिधींमध्ये मतभिन्नता आहे. यामुळे हा पूल कसा असावा यासाठी वाहतूक पोलिसांकडे अहवाल मागविला आहे. पोलिसांनी सर्वेक्षण करून अहवाल तयार केला असला तरी त्यावरही लोकप्रतिनिधींचे मतभेद आहेत. यामुळे या पुलाचे काम अद्याप सुरूच होउ शकलेले नाही. दुसरीकडे मागील वर्षी कोंढव्यातून गंगाधाम चौकात येणार्या तीव्र उताराच्या रस्त्यावर मागीलवर्षी डंपरच्या धडकेत एक दुचाकीस्वार महिला मरण पावली. यानंतर पथ विभागाने अधुनिक तंत्रज्ञान आणि मटेरियलचा वापर करून हा उतार कमी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. तसेच पोलिसांनीही या रस्त्यावर दिवसा जड वाहतुकीला बंदी घातली.
पहिल्यांदा तांत्रिक कारणास्तव निविदा रद्द करण्यात आली. मात्र, दुसर्यावेळी २० टक्के कमी दराने निविदा आली. हे काम आपल्याच ठेकेदाराला मिळावी यासाठी जो या निवेदेचा विजेता ठरला त्याला अपात्र करण्यासाठी प्रशासनावर एका माननीयांनी दबाव टाकला. त्यामुळे निविदा उघडल्यानंतरही महिन्याहून अधिक काळ प्रशासनाने मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवली नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे कामही रखडले आहे. अशातच बुधवारी गंगाधाम चौकात अपघात झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघातस्थळी भेट देत जड वाहतूक बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्यासाठी मागविलेली निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविल्याचे सांगितले. तसेच गंगाधाम चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरबाबत पोलिसांकडून अहवाल मिळताच तोच अंतिम मानून तातडीने पूलाचे काम हाती घेण्यात येईल. कोंढव्यातून गंगाधाम चौकात येणार्या जड वाहनांना रोखण्यासाठी हाईट बार लावण्याची पोलिसांकडे परवानगी मागण्यात येईल, असे पावासकर यांनी नमूद केले.
Comments are closed.