Pune Police News | पुणे : वर्दीला काळिमा फासण्याचा प्रकार ! नाकाबंदीत दारु पिऊन बॅरिकेटला धडक देऊन महिला पोलिसाला जखमी केलेल्या कारचालकाकडून पोलिसांनीच घेतली लाच

Pune Police News | Pune: A way to tarnish the uniform! The police took a bribe from the driver who injured a female police officer by hitting a barricade while drunk during a blockade

पुणे : Pune Police News | पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात नाकाबंदी केली असताना मद्यप्राशन करुन आलेल्या भरधाव कारने बॅरिकेटला धडक दिली. बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलीस महिलेला ५० ते ६० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेऊन गंभीर जखमी केले. अशा आरोपीकडून पोलिसांनी लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचवेळी नाकाबंदीच्या ठिकाणी किमान तीन वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे नाकाबंदी हे गुन्हे प्रतिबंधासाठी नसून ते खंडणी उकळण्याचे नाके झाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या खंडणीखोर पोलिसांवर ‘‘देय वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारण राहणार नाही, अशा रितीने एक वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे’’ अशी शिक्षा सुनावली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल उत्तम नेवसे (नेमणूक विशेष शाखा), पोलीस हवालदार सुहास भिमराव धाडगुडे (नेमणूक लष्कर पोलीस ठाणे), पोलीस हवालदार प्रकाश दादासो कट्टे (नेमणूक, फरासखाना पोलीस ठाणे), पोलीस अंमलदार सचिन कल्या वाघमोडे (नेमणूक विश्रामबाग पोलीस ठाणे) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

हा प्रकार नायडु हॉस्पिटल लेनमध्ये एआयएसएसएमएस कॉलेज समोर वेलेस्ली रोड येथे ९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री एक वाजून २० मिनिटांनी घडला होता. नाकाबंदी करुन ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची कारवाई चालू असताना जहांगीर चौकाकडून आलेल्या एका कारचालकाने बॅरीकेटला धडक देऊन तेथे कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस हवालदार दीपमाला नायर यांना सुमारे ५० ते ६० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेऊन त्या गंभीर जखमी झाल्या. या गुन्ह्यातील आरोपी अर्णव सिंघल याचा जबाब घेतला असता त्याने सांगितले की, ८ डिसेंबर २०२४ रोजी कोरेगाव पार्क मधील नाकाबंदीचे ठिकाणी या पोलिसांनी त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले. तसेच त्याच दिवशी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क लेन नं. ७ येथे पब्लीक पब येथे जात असताना पबपासून सुमारे ७०० ते ८०० मीटर अंतरावर थांबले असताना तेथे एक टोव्हिंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये गाडी असल्याने १० हजार रुपये भरण्यास सांगून २ हजार ५०० रुपये घेतले आहे.

तसेच ९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असताना नाकाबंदीचे ठिकाणी या पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायाझर चेकिंग केली असता त्यामध्ये अल्कोहोल नसल्याचे दिसून आल्यानंतरही तुम सब दारू पिये हो, असे बोलून त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेऊन या पोलिसांनी गाडी सोडली आहे. तसेच त्यांनी  सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी नाकाबंदी करुन व तोंडाला मास्क लावून कारवाई केली. एकाच रात्री या पोलिसांनी किमान तिघा वाहनचालकांकडून १२ हजार ५०० रुपयांची वसुली केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी नाकाबंदी करुन किती गाड्या अडवून वाटमारी केली, याचा कोणताही तपशील समोर येऊ शकलेला नाही.

अशा या पोलिसांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन शिस्तीचे उल्लंघन करणारे अशोभनीय असे बेशिस्त, बेपर्वा, बेजबाबदारपणा व निष्काळजीपणाचे गैरवर्तन केले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली तर इतरांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले.

या कसुरी प्रकरणी त्यांना देय वार्षिक वेतनवाढ त्यापुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा रितीने २ वर्ष कालावधीतसाठी का रोखण्यात येऊ नये, म्हणून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या नोटीसीबाबत त्यांना २५ जून २०२५ रोजी पोलिीस आयुक्तांनी बोलावून घेतले होते. त्यांनी सादर केलेला खुलासा व समक्ष कलेले कथन याचे अवलोकन केल्यावर त्यांचा खुलासा अंशत: समाधानकारक आहे, असे मान्य करुन त्यांची वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारक राहणार नाही, अशा रितीने १ वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे, अशी शिक्षा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुनावली  आहे.