Pune Rain Update | पुण्यासह तीन जिल्ह्यात मुसळधार; हवामान विभागाचा हायअलर्ट जारी

पुणे : Pune Rain Update | अनुकूल हवामानामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी (५ जुलै) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा जिल्हावार अंदाज जाणून घेऊया.
पुणे जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी राहिली आहे. परंतु, धरण क्षेत्रात पुन्हा पावसाची तीव्रता वाढली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत पुण्यातील शिवाजीनगर परिसरात १.६ मिमी पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस होते. आज पुणे घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस चांगला राहिला. कोल्हापूर परिसरात १५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान २६ अंशांवर राहील. तसेच, कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सातारा परिसरात १७ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत साताऱ्यातील कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तथापि, घाटमाथ्यावर मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत सोलापूर जिल्ह्यात ०.१ मिमी पावसाची नोंद झाली. या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस होते. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी सांगली जिल्ह्यात ३ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान २८ आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील.