Pune Rural Police | वयोवृद्ध महिलेच्या पत्राशेडमधून सोन्याचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; विवाहित मुलीने सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते दागिने, 1 लाख 90 हजारांचा माल हस्तगत (Video)

पुणे : Pune Rural Police | नारायणगाव येथील वयोवृद्ध महिलेच्या विवाहित मुलीने सुरक्षित ठेवण्यासाठी आपले दागिने आईकडे दिले होते. तिने खताच्या पिशवीत हे दागिने ठेवून ती पिशवी पत्रा शेडच्या खुंटीला अडकवून ठेवली होती. चोरट्यांनी या पिशवीसह २ लाख ९६ हजारांचे दागिने चोरुन नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही घरफोडी करणार्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून दोन तोळे सोन्याचे दागिने, मोटासायकलसह १ लाख ९० हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. (Arrest In Theft Case)
भिमाजी साहेबराव गाडगे (वय ३५), बाबाजी काशिनाथ येवले (वय ३६), तुषार भाऊसाहेब शिरोळे (वय १८, तिघे रा. गाडगे मळा, कळस, ता. पारनेर, जि़. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे.
याबाबत आनंदाबाई दशरथ खिलारी (वय ६५, रा. शिरोळी तर्फे, आळे, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या २३ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता घराजवळील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून पुन्हा अडीच वाजता माघारी परत आल्या. तेव्हा त्यांचे घरालगतच्या पत्राशेडमधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. खुंटीला अडकवलेली पिशवीसह पिशवीतील सोन्याचे दागिने २ लाख ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.
भर दिवसा अवघ्या दीड तासांमध्ये ही चोरीची घटना घडली होती. वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याचे सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. घटनास्थळ हे ग्रामीण भागात असल्याने घटनास्थळाकडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दरम्यान एका संशयित मोटारसायकल गेल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे आसपासच्या लोकांकडे चौकशी केली असताना संशयित मोटारसायकल फिर्यादीच्या घराचे दिशेने जावून पुन्हा माघारी आल्याची माहिती मिळाली. ही मोटारसायकल व त्यावरील तिघांचा शोध घेत असताना ती भिमाजी गाडगे हा वापरत असल्याची माहिती मिळाली. संशयित हा बेल्हे गावात असल्याचे व त्याच्याबरोबर तिघे जण असल्याची माहिती २५ जानेवारी रोजी मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांनी तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून मोटारसायकल, सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र, दोन सोन्याच्या नथ असा १ लाख ९० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सहकारी बँकेत गहाण ठेवले असल्याचे सांगितले. ते दागिने कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात येणार आहेत.
फिर्यादी आनंदीबाई खिलारी यांचे व त्यांच्या मुलीने ठेवायला दिलेले दागिने चोरीला गेले होते. मुलीला सासरी त्रास होईल, याची त्यांना काळजी वाटू लागली होती. त्यांनी खूप आशा बाळगून आपली ही व्यस्था पोलिसांना सांगितली होती. हा गुन्हा उघडकीस आल्याचे समजल्यावर या महिलेचे अश्रु अनावर झाले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, राजू मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे यांनी केले आहे.
Comments are closed.