IMPIMP

Pune Traffic Police | वाहतूक पोलिसांची दादागिरी; तुला अटक करून दाखवतो ! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला वाहतूक पोलिसांकडून ‘हरताळ’?

by sachinsitapure

पुणे: Pune Traffic Police | पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी आदेश देऊन आठवडा देखील झाला नाही तोच वाहतूक पोलिसांनी ‘त्या’ आदेशांना हरताळ फासला आहे. शिवाजीनगर येथील सावरकर भवन समोरील (Sawarkar Bhawan Shivaji Nagar Pune) रस्त्यावर एका वाहनचालकाला पोलीस हवालदार आणि त्यांच्यासोबत क्रेनवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी बाहेरील साथीदार बोलावून मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पोलीस चौकीत गेलास तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

माहिती अशी की काल (मंगळवार) दुपारी एक युवक रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मित्राची वाट पहात होता. त्यावेळी तेथे आलेल्या वाहतूक पोलिसांची क्रेन तिथे आली. त्यावरील कर्मचारी गाडी टो करत असताना त्या युवकाने विरोध केला. तेवढ्यात त्या युवकाचा मित्रही तेथे पोहोचला. त्याने काय दंड असेल तो घ्या गाडी सोडा अशी विनंती केली. त्यावर पोलिसाने चौकीत येऊन गाडी घेऊन जा असे दरडावतच संगितले. आम्ही कामानिमित्त निघालो आहोत उशीर होईल, असे सांगत त्या तरुणांनी पुन्हा पुन्हा विनवणी केली. यामुळे चिडलेल्या पोलिसाने युवकाची गचंडी पकडली.

यावेळी नागरिकही जमा झाले होते. हा प्रकार सुरू असताना त्या क्रेनवरील कर्मचाऱ्यांचे दोन मित्र तेथे आले. त्यांनी त्या दोन तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली. नागरिकांनी सोडवल्यानंतर तू पोलिसांकडे गेलास तर आम्ही तुम्हा दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. यानंतर ते दोघे तरुण पोलीस चौकीत गेले. तिथेही पोलिसांनी आम्ही तुमची तक्रार घेतली तर तुमच्या विरोधातील तक्रार घ्यावी लागेल असे सांगत त्या तरुणांवर दबाव टाकला. यामुळे अखेर त्या तरुणांचा हिरमोड झाला, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने दिली.

दरम्यान मागील आठवड्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, नो पार्किंग मधील गाडीवर कारवाई करताना मालक तिथे असेल तर दंड आकारून गाडी तिथेच सोडा असे आदेश दिले आहेत. या आदेशाला आठ दिवसही उलटत नाहीत तोच आजची घटना घडल्याने, वाहतूक पोलीस आणि त्यांच्यासोबतचे क्रेन व टेम्पो वरील कर्मचारी चक्क आयुक्तांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Posts