Sharad Pawar NCP | शरद पवारांची राष्ट्रवादी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत

पुणे: Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासमोर राजकीय आव्हाने उभी राहिली आहेत. आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांबद्दल त्यांच्यात नाराजी आहे. काँग्रेसची शहरातील राजकीय अवस्था अतिशय बिकट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत तीन जागांवर विजय अपेक्षित असताना तीनही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.
विसर्जित महापालिकेत त्यांचे केवळ १० नगरसेवक होते. संघटना म्हणून काँग्रेस क्षीण झाली आहे. आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) या दुसऱ्या पक्षालाही शहरात फार मोठे राजकीय अस्तित्व नाही. त्यांचे ९ नगरसेवक होते. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जाण्याची राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची तयारी नाही. आघाडी म्हणून लढलो तर जागा वाटपात त्यांना बरोबरीने जागा द्याव्या लागतील ही भीती त्यामागे आहेच, शिवाय मोक्याच्या जागा ते मागतील व त्यातून सत्तेचे गणित बिघडेल, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ” आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. एकूण राजकीय स्थिती लक्षात घेऊन यासंदर्भात पक्षात स्थानिक स्तरावर आम्ही चर्चा करू, त्यातील मते पक्षाध्यक्षांसमोर मांडण्यात येतील आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. राजकीय शक्तीप्रमाणे जागा वाटप व्हावे असेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे असते. त्यामागची कारणे समजावून घेण्यात येतील.”
Comments are closed.