IMPIMP

Shaurya Din Vijaystambha | विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 10 लाख लोक येण्याची शक्यता; पाणी, वाहनसुविधेसह प्रशासन, पोलीस सज्ज

December 31, 2024

पुणे : Shaurya Din Vijaystambha | पेरणे फाटा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यावर्षी राज्यासह देशभरातून १० लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून प्रशासन, पोलीस सज्ज (Pune Police) आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावला असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी सांगितले.

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे ८ लाख भाविक आले होते. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता असून १० लाख लोक येतील, अशी शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलाचा चोख बंदोबस्त सोमवारपासून या परिसरात लावण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस दलाकडून ३ अपर पोलीस आयुक्त, १६ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त, १३२ पोलीस निरीक्षक, ४१४ सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ५०४३ पोलीस अंमलदार, १ हजार होमगार्ड, एस आर पी एफच्या ७ कंपन्या, बीडीडीएसची १८ पथके, क्युआरटीची ६ हिट, आर सी पी स्ट्रायकिंग ५ असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून त्याशिवाय २ मोबाईल सर्वेलन्स वाहने बंदोबस्ताकरीता मागविण्यात आली आहेत.

देशभरातून वेगवेगळ्या मार्गाने विजयस्तंभाकडे अभिवादनासाठी येणार्‍या लोकांचे वाहनांसाठी सर्व मार्गावर पुरेशी दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. पार्किंग स्थळापासून विजयस्तंभाजवळ जाण्यासाठी मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
विजयस्तंभ परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलीस मदत केंद्रे व वॉच टॉवर्स बसविण्यात आलेले आहेत. अभिवादन सोहळा कार्यक्रम शांतता व सुव्यवस्थेत पार पडावा, यासाठी जातीय द्वेष पसरविणारे संदेश असलेले बॅनर, होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. विजयस्तंभ परिसरात कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम करणे किंवा फेकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
विविध रॅली दरम्यान संबंधितांची रस्त्यावरील वागणूक, वेळ व मार्ग निश्चिती, लाऊड स्पिकरची वेळ, ध्वनी तीव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण व सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविताना उच न्यायालयाच्या आदेशाने पालन करण्यासाठी मनाई आदेश काढण्यात आले आहेत.