IMPIMP

Wanwadi Pune Crime News | पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण

September 5, 2024

पुणे : Wanwadi Pune Crime News | पावसामुळे आंब्याच्या झाडाची फांदी खाली वाकली होती. त्यात कचरा वाहतूक करणार्‍या ट्रकने त्याच्याखालून गाडी नेली. ट्रकच्या धडक त्याला फांदीला लागली. त्यामुळे ती फांदी नेमकी मागून येणार्‍या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडली. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) मनपाचा कचरा वाहतूक करणारा ट्रकचालक व पुणे महापालिकेचे उद्यान विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पंडित फकीरा पाटील Pandit Fakira Patil (वय ५८, रा. आदर्शननगर) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना हांडेवाडी रोडवरील सातवनगर येथील आयुष मेडिकलसमोर ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी पावणेनऊ वाजता घडली होती.

याबाबत गिता पंडित पाटील (वय ५०, रा. आदर्शनगर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जबर दुखापत होते. अपघातात काही जणांना आपले प्राणही गमावावे लागले आहेत. तरीही महापालिका रस्ते व त्याच्या आजूबाजूच्या बाबी व्यवस्थित ठेवण्यामध्ये कुचराई करते. त्यामुळे अपघात होऊन लोकांना आपले प्राण गमावावे लागतात. महापालिकेच्या उद्यान विभागाने रस्त्यावर आलेली झाडाची फांदी वेळेवर लक्ष देऊन हटविली असती तर पंडित पाटील यांना आपले प्राण गमावावे लागले नसते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती त्यांच्याकडील दुचाकीवरुन जेवणाचे डबे पोहचविण्यास जात होते. हांडेवाडी रोडवरील आयुष मेडिकलसमोर ते आले. त्यावेळी त्यांच्यासमोर मनपाची कचरा ट्रक होता. चालकाला आंब्याचे झाडाची फांदी पावसाळयामुळे खाली वाकलेली असल्याने ती त्याचे ट्रकला लागेल हे दिसत असतानाही त्याने बेदकारपणे ट्रक चालवून फांदीस धडक दिली. त्यामुळे ती फांदी तुटून पाठीमागून येणारे पंडित पाटील यांच्या अंगावर पडून त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. या घटनेला कचरा ट्रकचालक जबाबदार असल्याने त्याच्या व उद्यान विभागाच्या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.