IMPIMP

Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025 | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”

Chandrahar Patil | Thackeray group shocked in Sangli? Photo of Chandrahar Patil and Shrikant Shinde's secret meeting in Delhi goes viral
February 4, 2025

सांगली: Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025 | महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळने उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाडवर विजयी मात करत मानाची गदा पटकावली. पण या दोन्ही फेरीच्या सामन्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

या सामन्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केले. दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले, ” २००७ साली महाराष्ट्र केसरी होत असताना मी सांगली जिल्ह्याला २७ वर्षांनंतर मानाची गदा मिळवून दिली. अनेक वर्षे डबल महाराष्ट्र केसरी कोणीही नव्हते. पण मला आणि सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळाला. तसेच तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी मैदानात उतरणारा पैलवान मी होतो. आता ज्या प्रकारे शिवराज राक्षेवर पंचांनी अन्याय केला, शिवराज राक्षेला ज्या प्रकारे हरवण्यात आले. त्याचप्रकारे मलाही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना हरवण्यात आले होते.

एका लाईव्ह कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळचे उपाध्यक्ष काकासाहेब पवार यांनी कबुली दिली की चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झालेला आहे. तसेच संदीप आप्पा भोंडवे हे आज कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी देखील कबुली दिली आहे की २००९ मध्ये चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झाला. मग आता सर्वच पदाधिकाऱ्यांनी कबूल करावे की माझ्यावर अन्याय झालेला आहे. मग माझ्या मनाचे समाधान होईल. “

ते पुढे म्हणाले, ” आज मी कुठल्याही महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा पाहायला जात नाही. माझ्यावर तेव्हा जो आघात झाला त्यामधून आजही मी बाहेर निघालेलो नाही. त्यावेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मला हरवण्यात आले तेव्हा मी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होतो. मात्र, सहकार्यांच्या मदतीने मी त्यामधून बाहेर निघालो.

मात्र, अशीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे. पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे शिवराज राक्षेचे आयुष्य बरबाद झाले. मलाही त्यामधून कुठेतरी बाहेर पडायचे आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या आत सर्वांनी कबुली नाही दिली तर मी महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार आहे”, असे चंद्रहार पाटील यांनी म्हंटले आहे.