IMPIMP

कोरोनाच्या पर्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय ! सर्व घरगुती क्रिकेट स्पर्धा IPL संपेपर्यंत स्थगित

by pranjalishirish
bcci suspends all age group tournaments due covid 19 jay shah writes letter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. या निर्णयामुळे विनू मांडक चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच IPL नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात बीसीसीआयचे BCCI  सचिव जय शाह यांनी सर्व राज्यांच्या संघटनांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये शहा यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीचा उल्लेख करुन देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती संघटनांना दिली आहे. तसेच देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा उशिराने सुरु झाल्या. महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देशांतर्गत स्पर्धा सुरु करण्यासाठी जानेवारी 2021 पर्यंत वाट पहावी लागली, असेही पत्रात नमूद केले आहे.

आपण एजीएममध्ये चर्चा केल्याप्रमाणे आयपीएल लिलावाआधी सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेपासून घरगुती क्रिकेट स्पर्धांना पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विजय हजारे चषक ही देशांतर्गत टी-20 मालिका यशस्वीपणे खेळवण्यात आली. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये या मालिकेतील सामने खेळवण्यात आले. 14 मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियमवर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशनदरम्यान अंतिम सामना खेळवण्यात आला, असे शाह यांनी म्हटले आहे.

सध्या महिलांच्या वरीष्ठ गटातील एकदिवसीय सामन्यांची मालिका देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 4 एप्रिल रोजी होणार आहे. या मौसमात वेगवेगळ्या वयोगटातील जास्तीत जास्त घरगुती सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता हे सामने खेळवणे शक्य नसल्याने सर्वच वयोगटातील क्रिकेट मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच खेळाडूंना सामने खेळण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. क्वारंटाईनचे नियम आणि बायो बबल्स यासारख्या सर्वच गोष्टींचा विचार करुन देशांतर्गंत होणारे घरगुती क्रिकेट सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी पत्रात लिहिले आहे.

सामने कधी होणार ?

सध्याच्या परिस्थितीमध्ये क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी काही राज्यांमधील परिस्थिती अनुकूल नाही. त्यातच येत्या काळामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. खेळाडूंना परीक्षेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वेळ मिळावा आणि त्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ मिळायला हवा. तसेच खेळाडूंचे आरोग्य, त्यांची सुरक्षा यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे IPL 2021 स्पर्धा झाल्यानंतर सर्व वयोगटातील स्पर्धांचे पुन्हा आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करु, असे पत्रात म्हटले आहे. IPL 2021 स्पर्धेतील सामने 9 एप्रिल ते 30 मे या कालावधीत होणार आहेत.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts