IMPIMP

Murlidhar Mohol On Solapur Airport | सोलापूर विमानतळाचे लवकरच ‘टेक ऑफ’ ! तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश; ⁠सेवांसाठी विमान कंपन्यांशीही चर्चा

August 29, 2024

नवी दिल्ली : Murlidhar Mohol On Solapur Airport | बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळावरून लवकरच हवाई वाहतूक सुरू होणार असून विमानतळासाठी आवश्यक असलेला डीजीसीए परवाना आणि तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कामे विमानतळावर युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरकरांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

सोलापूर विमानतळाबाबतच्या विविध विषयांसंदर्भात नवी दिल्लीत मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यात हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शरद कुमार यांच्यासह अक्सा आणि इंडिगो कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याबद्दल अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘उडान-आरसीएसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूर विमानतळासाठी ५० कोटींची विविध विकासकामे झाली आहेत. शिवाय सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण सुरु असून ते लवकरच सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘डीजीसीए’ (नागरी विमान महानिदेशालय)च्या परवान्यासाठी आणि तांत्रिक बाबींच्या लवकरात लवकर पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत’, असेही मोहोळ म्हणाले.

विमान कंपन्यांशीही बोलणीला सुरुवात !

सोलापूरहून देशाच्या विविध ठिकाणी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासह मोहोळ यांनी पुढाकार घेतला असून सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैद्राबाद या सेवा सुरु करण्यासंदर्भातही मोहोळ यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत सकारात्मक चर्चा केली.