IMPIMP

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : कुख्यात गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक, 4 पिस्टल, 6 काडतुसे जप्त

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार पिस्टल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. (Pistols-Cartridges Seized)

दुर्गेश बापु शिंदे (वय-37 रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर), प्रविण उर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ (वय-32 रा. समतानगर, राजगुरुनगर, ता. खेड, मुळ रा. मु.पो. वाळद ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहीद अशोक कामटे बस स्टॉप जवळील चिंचवड देवस्थानच्या मोकळ्या जागेत एक जण थांबला आहे. त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या सॅकची झडती घेऊन 2 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख 2 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 जून रोजी करण्यात आली. तपास पथकाने आरोपीकडे सखोल तपास करुन त्याचा साथीदार प्रविण उर्फ डॉलर ओव्हाळ याला खेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त केली.

गुन्हेगारांना दुप्पट किमतीत पिस्टलची विक्री

आरोपी दुर्गेश शिंदे हा मध्य प्रदेशच्या सिमा भागात जावून ग्रामीण भागातील लोकांना हाताशी धरुन देशी बनावटीचे पिस्टल खरेदी करत होता. खरेदी केलेली पिस्टल राज्यात फिरुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दुप्पट किमतीत विक्री करत होता. त्याच्यावर सोलापुर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, पिंपरी चिंचवड याठिकाणी आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.

दुर्गेश शिंदे याचा साथीदार प्रविण उर्फ डॉलर ओव्हाळ याच्यावर शिरुर व खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शरिराविरुद्ध आणि मलाविरुद्ध गुन्हे करणारा तो कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र बँकेवर पिस्टल व घात शस्त्रांसह भरदिवसा दरोडा टाकून लाखो रुपये लुटून नेले होते. तसेच घोडेगाव परिसरातील कुख्यात गुंडाचे अपहरण करुन त्याचा निर्घृण खून केला होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक केराप्पा माने, पोलीस अंमलदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, देवा राऊत, आतिष कुडके यांच्या पथकाने केली.

Related Posts