IMPIMP

Ajit Pawar NCP | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना पुन्हा धक्का; आणखी 2 पदाधिकारी शरद पवार गटात

by sachinsitapure

चिंचवड: Ajit Pawar NCP | पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना एकामागून एक धक्का बसत आहे. अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आता शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) वाटेवर आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर (Vishal Wakadkar) आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर (Vishal Kalbhor) यांनी अजित पवार यांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांचा होल्ड असल्यामुळे आमदार, माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर बरंच पुलाखालून पाणी गेलं आहे. चिंचवड आणि भोसरीला भाजप आमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याने खळबळ उडाली. चिंचवड पोटनिवडणूक लढवलेल्या नाना काटे (Nana Kate) यांनी काहीही झाले तरी निवडणूक चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती. आता याच दारातून नाना काटे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या ऑफरनुसार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गव्हाणे हे मेळावा घेऊन काही नगरसेवकांसह लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच युवकच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर बुधवारी काळभोर आणि वाकडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Related Posts