IMPIMP

Hindenburg Report | हिंडनबर्गच्या आरोपांनी पुन्हा खळबळ! आता आदानींसह आणखी एक नामांकित उद्योगपती फेऱ्यात, कंपनीचे शेयर घसरले, सेबीलाही धुडकावत म्हटले…

by sachinsitapure

नवी दिल्ली : Hindenburg Report | सुमारे दिड वर्षाच्या शांततेनंतर हिंडनबर्गने पुन्हा खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी अदानी समुहासह (Adani Group) आणखी एका नामांकित भारतीय उद्योगपतीवर आरोप केले आहेत. हिंडनबर्गच्या या वक्तव्याचा परिणाम आज शेयर बाजारावर दिसला, कंपनीचे शेयर घसरले. तत्पूर्वी भारतीय नियामक सेबीने (SEBI) हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस जारी करत अदानी समुहावर केलेल्या आरोपांवर उत्तर मागितले होते.

मात्र, हिंडनबर्गने सेबीला धुडकावून लावले. अमेरिकन संशोधन कंपनी हिंडनबर्गने या नोटीसला अनावश्‍यक कारवाई म्हटले आणि यानंतर नवीन वक्तव्य जारी करून आणखी एका भारतीय कंपनीवर निशाणा साधला.

अमेरिकन शॉर्ट-सेलर आणि गुंतवणूक संशोधन कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने दावा केला की, अरबपती बँकर उदय कोटक (Uday Kotak) यांनी बँकेसोबतच ब्रोकरेज कंपनीची स्थापना केली आणि एक अज्ञात गुंतवणुकदाराद्वारे वापरलेल्या परदेशी निधीवर देखरेख केली. याचा वापर अदानी समुहाच्या घसरलेल्या शेयरमधून लाभ घेण्यासाठी करण्यात आला.

अगोदर केले होते हे आरोप…

हिंडनबर्गने जानेवारी, २०२३ मध्ये अदानी समुहावर शेयरच्या भावात हेराफेरी आणि आर्थिक गडबड केल्याचा गंभीर आरोप करत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. यानंतर अदानी समुहाच्या शेयरमध्ये मोठी घसरण झाली होती. या रिपोर्टसाठी अमेरिकन कंपनीला सेबीने कारणे दाखवा नोटीसुद्धा पाठवली आहे.

हिंडनबर्गने सेबीच्या कारणे दाखवा नोटीसला धमकावण्याचा प्रयत्न असे संबोधत म्हटले की, सेबीने कोटक यांचे नाव का घेतले नाही. जानेवारी, २०२३ च्या रिपोर्टमध्ये, एका गुंतवणुकदारांशी संबंधाने बनवलेल्या शॉर्ट पोझिशनने संबंधित लाभाद्वारे सुमारे ४१ लाख डॉलरचा एकुण महसुल मिळवला गेला आणि अदानी यूएस बाँडद्वारे सुमारे ३१,००० डॉलरचा लाभ कमावला. मात्र, त्यांनी गुंतवणुकदाराच्या नावाचा खुलासा केला नाही.

आता कोटकवर निशाणा

हिंडनबर्गने म्हटले, सेबीच्या नोटीसमध्ये स्पष्टपणे त्या पक्षाच्या नावाचा उल्लेख नाही ज्यांचा भारताशी प्रत्यक्षात संबंध आहे. कोटक बँक. भारतातील मोठी बँक आणि ब्रोकरेज कंपन्यांपैकी एक आहे. तिची स्थापना उदय कोटक यांनी केली होती, ज्यांनी आमच्या गुंतवणूक भागीदाराद्वारे अदानीविरूद्ध पैस लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या परदेशी निधीची उभारणी तसेच देखरेख केली होती.

याऐवजी सेबीने केवळ के-इंडिया ऑपर्च्युनिटीज फंडाच्या नावाचा उल्लेख केला आणि कोटकच्या नावाऐवजी केएमआयएल असे नाव लिहिले. केएमआयएल म्हणजे कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेन्ट्स लिमिटेड आहे, जी एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे.

कोटकवर केले गंभीर आरोप

हिंडनबर्गने म्हटले की, बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी व्यक्तीगतरित्या सेबीच्या २०१७ च्या कॉर्पोरेट गव्हर्नंस समितीचे नेतृत्व केले होते. आम्हाला शंका आहे की सेबीने कोटक अथवा कोटक बोर्डाच्या कोणत्याही इतर सदस्याचा उल्लेख न करणे कदाचित आणखी एका ताकदवान भारतीय उद्योगपतीला चौकशीच्या शक्यतामधून वाचवण्याचा प्रयत्न आहे. सेबी असे करताना भासत आहे.

कोटक आणि अदानी यांच्या शेयरमध्ये घसरण

शेयर बाजारात आज अदानी इंटरप्रायझेस आणि कोटक महिंद्रा बँक दोन्ही कंपन्यांच्या शेयरमध्ये घसरण दिसून आली. कोटकच्या शेयरमध्ये २.११ टक्के घसरण झाली आणि शेयर १,७६९.९० रुपयांवर आला. दुसरीकडे अदानी इंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये १ टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आणि तो ३,१५०.३५ रुपयांवर आला.

Related Posts