IMPIMP

Rohit Pawar On Ajit Pawar | ‘अजित पवारांचं कुटुंब आता वेगळं’, घराणेशाहीवरील प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवारांचे वक्तव्य

by sachinsitapure

बारामती: Rohit Pawar On Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला शरद पवारांशी (Sharad Pawar) फारकत घेत अजित पवार काही नेत्यांना घेऊन महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात आपल्या पत्नीला निवडणुकीसाठी उतरवले. यामुळे पवार कुटुंबात दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र सुप्रिया सुळेंनी आम्ही कुटुंब म्हणून एक असल्याचे म्हंटले होते. मात्र आमदार रोहित पवार यांनी अजित पवार कुटुंब (Ajit Pawar Family) वेगळं असल्याचं म्हंटलं आहे.

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची (Rajya Sabha) खासदारकी देण्यात आली. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांनी तो निर्णय का घेतला? राजकीय दृष्टिकोनातून तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामधील काही आमदार आणि नेते कुठेतरी काहीतरी कुजबुज करत असतील. कारण त्यांचा कोणावरच विश्वास नसल्यामुळे त्यांनी घरच्या व्यक्तीला ते पद देण्याचा निर्णय घेतला असेल. कारण अजित पवारांचा कोणावरही विश्वास नसेल. आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं आहे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळं आहे”, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

“केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली नाही. पण प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. मी जिल्हा परिषद सदस्य असताना दुसरं कोणतंही पद माझ्याकडे नव्हतं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना इतर लोकांच्या जवळच्या नेत्यांना संधी दिली गेली. पण मला तेथे पद नव्हतं. मात्र, आम्हीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. कारण आमची सुरुवात होती. त्यानंतर आम्ही संघर्ष करत आहोत”, असं रोहित पवारांनी म्हटलं.

बारामतीमध्ये पवार कुटुंबात तीन खासदार आहेत. तसेत दोन आमदार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबावर घराणेशाहीची टीका होत आहे, या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “आता टीका करणारे लोक कोण आहेत? टीका करणारी व्यक्ती फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. नरेंद्र मोदी एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसरीकडे अनेक कुटुंबांना फोडून नेते स्वतःकडे घेत आहेत.

यामध्ये विखे पाटील कुटुंब, पवार कुटुंब, मुंडे कुटुंब असे अनेक कुटुंब आपल्याला दिसतील. सर्वात जास्त घराणेशाही नेते कोणाकडे असतील तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. घराणेशाहीचा विषय तेच काढतात आणि नेत्यांनाही तेच घेतात. त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे”, अशी टीका रोहित पवारांनी भाजपावर केली.

Related Posts