IMPIMP

Sunita Williams-Butch Wilmore | सुनीता विल्यम्स-बुश विल्मोर यांच्या अंतराळातून परतण्याकडे जगाचे लक्ष, इस्त्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिली महत्वाची माहिती

by sachinsitapure

नवी दिल्ली : Sunita Williams-Butch Wilmore | भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर हे बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले आहेत. परंतु तांत्रिक अडचणीमुळे दोघे तिथेच अडकून पडले आहेत. नासाचे शास्त्रज्ञ या स्थितीवर लक्ष ठेवून असून परतीच्या प्रवासासाठी सतत प्रयत्नशील आहेत.

यामुळे थोडी चिंता व्यक्त होत असली तरी याबाबत इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ (ISRO Chief S Somnath) यांनी दिलेली माहित महत्वाची मानली जात आहे. सोमनाथ यांनी नवीन अंतराळयानाचे पहिले उड्डाण करण्याच्या धाडसाबद्दल सुनीता विल्यम्स यांचे कौतुक केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाबाबत म्हटले की, सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याचा विषय चिंतेचा नसावा, लोकांना दीर्घकाळ राहण्यासाठी स्पेस स्टेशन हे सुरक्षित ठिकाण आहे.

एस. सोमनाथ म्हणाले, हे फक्त सुनीता विल्यम्स किंवा इतर कोणत्याही अंतराळवीरांबद्दल नाही. त्यांना एक ना एक दिवस परत यावे लागेल. संपूर्ण मुद्दा बोईंग स्टारलाइनर नावाच्या नवीन क्रू मॉड्यूलच्या चाचणीचा आहे. ते सुरक्षितपणे परत येण्याच्या क्षमतेबद्दल आहे. आयएसएस हे लोकांसाठी दीर्घकाळ राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.

सोमनाथ म्हणाले, नासाचे दोन अंतराळवीर बुश विल्मोर आणि सुनीता विल्यम्स १४ जून रोजी परतणार होते. मात्र, बोईंगच्या स्टारलाइनर यानाला अनेक तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे त्यांच्या परतीला विलंब झाला. अंतराळवीरांच्या परत येण्याची चिंता करण्याऐवजी नवीन क्रू मॉड्युल आणि अवकाशात प्रवास करण्याच्या क्षमतेची चाचणी करण्यावर विचार केला पाहिजे.

एस सोमनाथ म्हणाले, आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या नावावर अनेक मोहिमा आहेत. नवीन अंतराळ यानाच्या पहिल्या उड्डाणावर प्रवास करणे ही एक धाडसी गोष्ट आहे. ते स्वत: डिझाइन टीमचा भाग आहेत आणि त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या इनपुटचा वापर केला आहे.

दरम्यान नासाने म्हटले आहे की, नासाचे दोन अंतराळवीर आयएसएसवर अधिक काळ राहू शकतात. ते सुरक्षित आहेत. मात्र नासाने अंतराळवीरांच्या परतीची कोणतीही तारीख दिलेली नाही. सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या आहेत. त्या आणि त्यांचा सहकारी यांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला आहे.

Related Posts