IMPIMP

Ajit Pawar On Nilesh Lanke | अजित पवारांचा निलेश लंकेना इशारा, माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर तुझा असा कंड जिरवेन की सतत अजित पवार…

by sachinsitapure

अहमदनगर : Ajit Pawar On Nilesh Lanke | अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरचे (Ahmednagar Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार निलेश लंके यांना दिला आहे.

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती. मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे.

अजित पवार म्हणाले, चुकीची माणसं दिली तर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त होते. लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिले, नको त्या माणसाला निवडून दिले. गेल्या आमदारकीला माझीसुद्धा चूक झाली. त्यावेळी तुमच्यातलेच अनेकजण माझ्याकडे आले होते. निलेशला उमेदवारी द्या अशी त्यांनी मागणी केली.

आमदार निलेश लंके यांच्यावर घणाघात करताना अजित पवार म्हणाले, उमेदवारी दिली, मात्र वाटले नव्हते बाबा असे दिवे लावेल. गडी दिसायला बारीक, मात्र लय पोहोचलेला. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसे साधे घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितले.

आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, आता तर तो आमदारही नाही. तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस झाला आहे. त्यामुळे त्याची अरेरवी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नये. आपल्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करू नये. मात्र कोणी अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका.

निवडणूक आयोगाला सुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत. इथे प्रत्येक व्यावसायिकाला आणि डॉक्टरला बिल न घेण्यासाठी दादागिरी केली जाते हे सुद्धा मला समजले. तुम्ही अजिबात घाबरू नका महायुती आता तुमच्या पाठीशी आहे, असे पवार म्हणाले.

निलेश लंके यांना सुनावताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार आला होता व तो आपल्या पाठीशी आहे. आपल्या आमदाराने राजीनामा दिला आता कोण वाली हे समजू नका. पालकमंत्री विखे आता आपल्यासोबतच आहेत. महाराष्ट्राला दाखवून द्या हा फुगा होता.

अजित पवार पुढे म्हणाले, इथले नगराध्यक्ष मला येऊन भेटले. त्यांनी सांगितले. मी त्यांना म्हणालो इतके दिवस गप्प का? आधी बोलले असते तर आधीच बंदोबस्त केला असता. गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. ४ जूनला पेट्या उघडल्यावर हे लंकेचं पार्सल घरी पाठवण्याचे काम करा.

Related Posts