IMPIMP

Devendra Fadnavis On Pune Lok Sabha | काम केले तरच उमेदवारी अन्यथा…, फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी (Video)

by sachinsitapure

पुणे : – Devendra Fadnavis On Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपचे काही नगरसेवक आमदार प्रचारापासून दूर असल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांची पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बैठक घेतली. त्यावेळी या नेत्यांना व्यवस्थित काम करा अन्यथा पुढच्या निवडणुकीत उमेदवारी विसरा, दुसऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल अशी तंबी त्यांनी दिली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. आमदार, नगरसेवक यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही माजी नगरसेवक, आमदार पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनाच्या बैठकीला तीस नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यातच शुक्रवारी फडणवीस यांनी माजी नगरसेवाकांची कोरेगाव पार्क येथे बैठक घेऊन योग्य शब्दात तंबी दिली.

मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी शिरुर लोकसभेतील हडपसर विधानसभा आणि बारामती लोकसभेतील खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. त्या भागातील माजी नगरसेवकांनी त्याठिकाणी जास्त ताकद लावून जास्तीत जास्त मतदान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला करुन घ्या. यात कोणत्याही पद्धतीने दुर्लक्ष करु नका, असे स्पष्ट शब्दात सुनावले.

पुण्यातील प्रत्येकाने सोसायटी भेटी, कोपरा सभा, घरोघरी जाऊन वैयक्तिक गाठीभेटी वर लक्ष द्या. पुण्याची जाग आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायची आहे. जे लोकसभेसाठी काम करतील त्यांचाच विचार विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत केला जाईल. जे काम करणार नाहीत त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी बजावले.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, पुण्यातील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी सर्वजण उपस्थित होते. प्रचारात जे नगरसेवक चांगले काम करत आहेत, त्यांचा सत्कार केला जाईल. जे चांगले काम करणार नाहीत त्यांच्याकडे बघितले जाईल.

लोकसभा निवडणुकीत कोण प्रचार करत आहे, कोण करत नाही यावर आमचे लक्ष आहे. त्याची माहिती आम्हाला वेळोवेळी दिली जात आहे. सध्या 10 ते 15 नगरसेवक, काही आमदार काम करत नाहीत. त्यांच्या नावासह आमच्याकडे यादी आहे. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील व्यक्तीगत बोलून समज देतील. त्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Deepak Mankar On Baramati Lok Sabha | मतदार सुनेत्रावहिनींकडे बारामतीचे नेतृत्व देतील असं स्पष्ट दिसतंय, दीपक मानकरांना विश्वास

Related Posts