IMPIMP

Dr Bhagwan Pawar | डॉ. भगवान पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार

by sachinsitapure

पुणे : Dr Bhagwan Pawar | जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक छळ आदीं विविध तक्रारी प्राप्त होत्या. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेतली आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

डॉ. पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबार येथे मुख्यालय देण्यात आले आहे. या चौकशी दरम्यान त्यांना आणि संबंधित तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची पुर्ण संधी आहे.

डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे यासह आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप शासनास प्राप्त झाले होते. सतत तक्रारी प्राप्त होत असल्याने २९ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. पवार यांच्याविरुद्धच्या तक्रारींचे गंभीर स्वरुप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्यादृष्टिने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार त्यांचे निलंबन करणे आवश्यक आहे अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यांच्यावर चौकशी समितीने विविध आरोप ठेवले आहे.

पुढील सविस्तर चौकशी व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Posts