IMPIMP

Karhade Brahman Sangh Pune | कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रविवारी वासंतिक उत्सवाचे आयोजन

by sachinsitapure

पुणे : Karhade Brahman Sangh Pune | समाजाची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्यासाठी एकत्रितपणे काम कराव्ो, एकमेका साहाय्य करून समाज उच्चशिक्षित करावा या सामाजिक बांधिलकीच्या उद्देषाने कै. दत्तो वामन पोतदार यांनी 1 ऑक्टोबर 1930 रोजी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे या एका कौटुंबिक आस्थापनेची स्थापना केली. शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या संघाचा यंदाचा वासंतिक उत्सव रविवार, दि. 19 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सचिव बळवंत भाटवडेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर उपस्थित होते.

वासंतिक महोत्सव पुण्याई सभागृह, पौड रोड येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी ‌‘कीर्तन संध्या‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘मनुष्य जीवनात संपन्नता‌’ या विषयावर ह. भ. प. मोहक रायकर (डोंबिवली) यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना भूषण कुलकर्णी (संवादिनी), गजानन इंगवे (तबला) साथ करणार आहेत.

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा अमृत महोत्सवी सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे.

कऱ्हाडे ब्राह्मण संघाविषयी…

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे काम पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्रात सुरू आहे. संघाचे आज मितीला 2500 सभासद आहेत. या वर्षी संघाचे 94 वे वर्ष असून आता संघाची शताब्दीकडे वाटचाल चालू आहे.

पुणे शहराचे वैभव असलेला बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीचा पुतळा कऱ्हाडे ब्राह्मण संघाने पुणे महापालिकेला दि. 17 जून 1957 रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत प्रदान केला. झाशीच्या राणीच्या जन्मदिनी व पुण्यतिथीला महापौरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जातो. तसेच संघातर्फे अध्यक्ष हार अर्पण करतात. ही प्रथा संघाने चालू केली आहे. यावेळी संस्थेचे सभासद, परिसरातील नगरसेवक, मॉडर्न हायस्कूलचे बँड व ध्वज पथक, राष्ट्रसेविका दलाच्या महिला, झाशी राणी सैनिक स्कूलचे पथक उपस्थित राहून राणीला मानवंदना देतात.

संघाच्या उपलब्ध निधीतून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच सभासदांना आवश्यकतेनुसार आरोग्यविषयक मदतही केली जाते.

हिंदू सण एकत्रितपणे साजरे करावेत ह्या उद्देशाने संघातर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यात संक्रांतीचा तिळगुळ समारंभ साजरा केला जातो. एप्रिल-मेमध्ये वासंतिक मेळावा व डाळ पन्हे कार्यक्रम, जुलै-ऑगस्ट दरम्यान श्रावणगीत हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जातो. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या व्ोळी ज्ञातीतील सभासदांच्या प्रावीण्य प्राप्त मुला-मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते.

8 मार्च जागतिक महिला दिनी ज्ञातीतील वैशिष्ट्यपूर्ण व समाजोपयोगी काम करणाऱ्या भगिनींना झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महिला दिनाचा हा कार्यक्रम सर्व महिला व पुरुष सभासदांसाठी खुला असतो.

19 नोव्हेंबर हा राणीचा जन्मदिवस असल्याने पुणे शहरातील दरवर्षी एका शाळेमध्ये या दिवशी शाळेच्या सहकार्याने शाळेतील अभ्यासेतर विविध मैदानी खेळात प्रावीण्य मिळविणाऱ्या तीन मुलींना पुरस्कार देण्यात येतो. संघाची शिखर संस्था कऱ्हाडे ब्राह्मण महासंघातर्फे राणीचा फोटो व राणीचे चरित्र असणारी 100 पुस्तके शाळेला भेट दिली जातात.

आजपर्यंत मॉडर्न मुलींची शाळा, रेणुका स्वरूप मुलींची शाळा, नु. म. वि. मुलींची शाळा, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची शिशुविहार शाळा या शाळांमध्ये हा उपक्रम झाला आहे. तेथील मुलींनी तलवार बाजी, भालाफेक, दांडपट्टा याची प्रात्यक्षिके दाखवली आहेत.

यावर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नऱ्हे येथील व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार प्रदानाबरोबर शाळेतील सुमारे तीनशे मुलींना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके मुलांच्या उपस्थितीत दाखविण्यात आली व त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे प्रसंगी मुलांनाही त्याचा स्वसंरक्षण करण्यासाठी व मुलींना त्यांची सक्षमता समजण्यासाठी उपयोग होईल.

यावर्षी सामाजिक बांधिलकी या नात्याने व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेतील तीन एकल पालक विद्यार्थिनींना त्यांचे पालक अचानक निवर्तल्यामुळे त्यांच्या शालेय फीच्या 60 टक्के फी संघाने मदत म्हणून दिली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मदत द्यायचे ठरविले आहे.

संघाच्या आज पर्यंतच्या 94 वर्षांच्या वाटचालीत अनेक नामवंत व कर्तबगार सभासदांनी अध्यक्षपद भूषविले आहे व संघाचे कार्यकर्तृत्व सांभाळले आहे.

कोरोनासारख्या संकटकाळात संघाने वेगळा स्वनिधी गोळा केला व गरजूंना मास्क, सॅनिटायझर बाटल्या, होमिओपॅथी संरक्षक औषधे यांचे मोफत वाटप केले आहे.

सभासदांंच्या लोकसहभागातून समाजासाठी एक अँम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आलेल्या संकटात कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व कोकणातील काही ठिकाणी अन्नधान्य व आर्थिक मदत पोचविली आहे.

सायबर सुरक्षितता, आहारातून आरोग्य संरक्षण यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन परिस्थितीनुरूप ज्येष्ठ सभासदांसाठी केले जाते.
संघ शतकोत्सवी वर्ष आणखी काही विशेष उपक्रम राबवून व संघाच्या वाटचालीचा आढावा प्रकाशित करून साजरे करणार आहे.

Shrikant Eknath Shinde | संविधान बदलले जाणार असल्याचे सांगून समाजाची दिशाभूल, डॉ. श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Related Posts