IMPIMP

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्री मंडळातील समावेशा मुळे शहर व जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पाना गती मिळेल

by sachinsitapure

पुणे – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदार संघातील (Pune Lok Sabha) निर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची थेट केंद्रातील मंत्री पदी वर्णी लागली आहे. स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर पदानंतर थेट केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अलीकडच्या काळात विठ्ठलराव गाडगीळ, शरद पवार, सुरेश कलमाडी या पुणे जिल्ह्यातील खासदारांना केंद्रिय मंत्री मंडळात संधी मिळाली होती. तर मागील टर्म मध्ये मध्यप्रदेशातून राज्य सभेवर गेलेले परंतु मूळचे पुण्याचे प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात मंत्रिपद भूषविले आहे. प्रामुख्याने देशात आठव्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुणे शहराला मात्र सुरेश कलमाडी यांच्यानंतर मंत्रिपद मिळालें आहे.

पुण्याचा विचार करायचा झाल्यास सुरेश कलमाडी यांनी मंत्री पदाच्या काळात शहरासाठी मोठयप्रमाणावर निधी आणला. युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने म्हाळुंगे बालेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाची निर्मिती असो अथवा शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटिकरण मोठया प्रमाणावर झाले. बीआरटी प्रकल्पही कलमाडी यांच्याच काळात साकारला गेला. दिल्लीतील वर्तुळातील संबंधही यासाठी उपयोगी ठरले. त्यामुळे साधारण दोन दशके पुण्याच्या राजकारणावर त्यांची पकड राहिली. परंतु दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेतील कथित घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली आणि काँग्रेस ने त्यांना बाजूला केले. कलमाडी यांच्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी शहरात लक्ष घातले. त्यात त्यांना काही काळ यशही आले. परंतु 2014 नंतर मोदी च्या करिष्म्यापूढे अजित पवार यांचेही नाणे फिके पडले. केंद्र आणि राज्यातील सत्ते पाठोपाठ महापालिकेतही भाजपने प्रथमच एकहाती सत्ता खेचून आणली.

भाजपच्या सत्ता काळात रखडलेला मेट्रो, नदी सुधार आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली. चोवीस तास पाणी पुरवठा आणि पीएमपीचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली. योगायोगाने या कालावधीत महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर असा सुमारे साडेतीन वर्ष प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली. या प्रकल्पांसोबत महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्यात मोहोळ यांनी पुढाकार घेतला. 2020 मध्ये कोरोनाच्या साथीत आरोग्य व्यवस्था चांगली राहील यासाठी त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केले. याचे सर्वस्तरातून कौतुक झाले.

मोहोळ यांच्या कामाचा धडाका पाहूनच स्पर्धा असतानाही भाजपकडून त्यांना पहिल्याच यादीत लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेस चे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत सव्वा लाखाहून अधिक मतांनी विजय मिळविला. या विजयाचा गुलाल उतरत नाही तोच पक्षाने त्यांना मंत्री पदावर संधी दिल्याने दुधात साखर पडली आहे. मंत्रालयाचा कारभार सांभाळतानाच पुणे शहरासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल. केंद्रीय तसेच राज्य पातळीवर तांत्रिक बाबींसाठी अडकलेल्या प्रकल्पांचा देखील पाठपुरावा करून त्यांना गती मिळेल. पुणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतील अशी सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.

Related Posts