IMPIMP

PMC Property Tax | मिळकत कर विभागाच्या सर्वेक्षण मोहीमेसाठी अतिरिक्त 375 कर्मचारी उपलब्ध; 40 टक्के कर सवलत देण्यासाठी महापालिका प्रशासनाची विशेष मोहीम

by sachinsitapure

पुणे – PMC Property Tax | सदनिकाधारकांना मिळकत करातील चाळीस टक्के सूट देण्यासाठी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या कामासाठी अतिक्रमण विभागाकडील ७५ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील १५० आरोग्य निरीक्षक आणि पंधरा क्षेत्रिय कार्यालयांकडील ७५ मोकादमांसह तब्बल ३७५ अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी दिले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार महापालिका पालिका प्रशासनाने शहरातील निवासी मिळकत धारकांना मागील आर्थीक वर्षापासून मिळकत करामध्ये चाळीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ मालकच मिळकतीत राहात असलेल्यांनाच ही सवलत मिळणार आहे. यासाठी महापालिकेने मागीलवर्षी एका ठराविक मुदतीत मिळकत धारकांकडून तेच मिळकतीत राहात असल्याबाबत पीटी थ्री फॉर्म भरून घेतले होते. परंतू या मिळकतीस पात्र असलेल्या सुमारे साडेचार मिळकतींपैकी जेमतेम ६७ हजार मिळकत धारकांनीच हे फॉर्म भरले. त्यामुळे उर्वरीत मिळकत धारकांना शंभर टक्क्यांनुसार कर आकारणी करण्यात आली. यावरून बराच गोंधळ झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मागील शनिवारपासून या सर्व मिळकतींचे सर्वेक्षण आणि मालक त्याठिकाणी राहात असल्यास तेथेच पीटी थ्री फॉर्म भरून घेउन त्यांना करात सवलत देण्यासाठी विशेष मोहीमेची घोषणा केली.

मिळकतींची संख्या मोठी असल्याने आणि महिनाभरात हे काम पूर्ण करायचे उद्दीष्ट ठेवल्याने मिळकत कर विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी अतिक्रमण विभागाकडील ७५ सहाय्यक निरीक्षक, घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील १५० आरोग्य निरीक्षक, पंधरा क्षेत्रिय कार्यालयातील प्रत्येकी पाच असे ७५ मोकादम आणि अन्य विभागातील ७५ टंक लिपिक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचे काम पुर्ण होईपर्यंत हे मनुष्यबळ कर आकारणी विभागाशी संलग्न राहाणार असून त्यांवर केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी राहाणार आहे. त्यांना कर वसुलीचे कुठलेही अधिकार राहाणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. चोवीस जूनपासून हे अतिरिक्त मनुष्यबळ सर्वेक्षणाचे काम सुरू करणार आहे.

Related Posts