IMPIMP

Police Bharti In Pimpri Chinchwad | पिंपरी: पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीकरता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना मिळणार संधी

by sachinsitapure

पिंपरी :  – Police Bharti In Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना भरतीची एक संधी देण्याचा निर्णय पोलीस भरती निवड मंडळाने घेतला आहे. जे उमेदवार मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिले आहेत आणि ज्यांनी तारीख वाढवून घेतली नाही, अशा उमेदवारांची मैदानी चाचणी 10 जुलै रोजी घेतली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 19 जून पासून संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी येथे सुरु आहे. जे उमेदवार काही कारणास्तव मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहु शकले नाहीत, अशा उमेदवारांना त्यांनी केलेल्या विनंती अर्जाप्रमाणे यापुर्वीच तारीख वाढवून दिली आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा असल्याने 25 ते 30 जून या कालावधीत भरती प्रक्रिया स्थगित केली होती. 1 जुलै पासून भरती प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. काही उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले असल्याने त्यांना एकाच दिवशी मैदानी चाचणी देण्यासाठी हजर राहणे शक्य झाले नाही. अशा उमेदवारांना मैदानी चाचणी देण्यासाठी दुसरी तारीख दिली आहे. याबाबत उमेदवारांनी विनंती केली होती.

19 जून पासून जे उमेदवार गैरहजर आहेत व त्यांनी यापुर्वी शारिरीक चाचणीकरीता तारीख वाढवून घेतलेली नाही, अशा गैरहजर उमेदवारांना एक संधी उपलब्ध करुन देण्याबाबत भरती समितीने निर्णय घेतला आहे. गैरहजर उमेदवारांनी 10 जुलै रोजी प्रवेशपत्रातील सुचनेनुसार भोसरी येथे उपस्थित रहावे असे अपर पोलीस आयुक्त तथा पोलीस भरती निवड मंडळाचे अध्यक्ष वसंत परदेशी यांनी सांगितले. तसेच यानंतर येणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Posts