IMPIMP

Poona Hospital | 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पूना हॉस्पिटलच्या वतीने भविष्यवेधी योजना जाहीर

by sachinsitapure

पुणे : Poona Hospital | गेली ४० वर्षे अव्याहतपणे रुग्णसेवेचा व लोकसेवेचा वसा समर्थपणे पेलणाऱ्या पूना हॉस्पिटलने ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनेक भविष्यवेधी योजना जाहीर केल्या असून यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी हेल्थ कार्ड्स, हेल्थ पॅकेजेस आणि शहरातील इतर वैद्यकीय संस्थांसोबत संलग्नपणे रूग्णापर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील विविध भागांत आरोग्य शिबिरे अशा प्रयत्नांचा समावेश असल्याची घोषणा राजस्थानी आणि गुजराथी चॅरिटेबल फाउंडेशनचे (Rajasthani and Gujarati Charitable Foundation) व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया (Rajkumar Chordia) यांनी केली.

राजस्थानी आणि गुजराथी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असलेले पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ४० व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याचे औचित्य साधत एरंडवणे डी पी रस्ता येथे असलेल्या सिद्धी बँक्वेट्स येथे आयोजित कार्यक्रमात चोरडिया बोलत होते. यावेळी पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच रुग्णालयात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या २५ डॉक्टरांचा सन्मानही यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आला.

राजस्थानी आणि गुजराथी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष देवीचंद जैन, उपाध्यक्ष दाह्याभाई शाह, सह व्यवस्थापकीय विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त मंडळाचे इतर सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान मुकुंददासाजी लोहिया आणि देवीचंद जैन यांच्या नावाने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण देखील करण्यात आले.

या वेळी बोलताना राजकुमार चोरडिया म्हणाले, “स्थापनेपासूनच पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे नेहमीच लोकांच्या सेवेत अग्रणी राहिले आहे आणि लोकसेवेच्या भावनेतूनच आम्ही या ४० व्या वर्षात अनेक उपक्रम घेऊन आलो आहोत. यामध्ये आम्ही प्रामुख्याने पुणेकरांसाठी हेल्थ कार्ड सेवा सुरु करीत वेगवेगळ्या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा रास्त दरात उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. याचबरोबर अनेक प्रकारची हेल्थ पॅकेजेस नागरिकांसाठी उपलब्ध असतील. या पॅकेजेसद्वारे नागरिकांना अनेक प्रकारच्या टेस्ट्स व चेकअप पूना हॉस्पिटलमध्ये रास्त दरात करता येतील, असा आमचा विश्वास आहे.”

याशिवाय शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासोबतच त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या हेतूने आम्ही या वर्षी आयएमए (इंडियन मेडिकल ससोसिएशन), जनरल प्रक्टिशनर्स असोसिएशन, पुणे आणि मेडी जैन डॉक्टर्स असोसिएशन, पुणे या नामवंत संस्थांसोबत आरोग्य शिबिरांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही चोरडिया यांनी दिली.

१९८५ साली पुणे शहरातील राजस्थानी आणि गुजराथी बांधवांनी घेतलेला हा शहराच्या समाजसेवेचा वसा आम्ही असाच पुढे नेत राहू आणि शहराला अत्याधुनिक व रास्त दरातील आरोग्य सेवा देत राहू, असा विश्वास पुरुषोत्तम लोहिया यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीत गायक राहुल देशपांडे यांचा ‘राहुल देशपांडे लाईव्ह’ हा सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राहुल यांनी सादर केलेल्या मराठी व हिंदी गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राहुल यांना प्रसाद पाध्ये (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), तन्मय पवार (गिटार), अनय गाडगीळ (की बोर्ड), रोहन वनगे (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. पुरुषोत्तम लोहिया यांनी प्रास्ताविक केले तर राजेश शहा यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Related Posts