IMPIMP

Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यात निकालाबाबत धाकधूक वाढली; कमळ फुलणार, पंजा भारी ठरणार की वसंत तात्यांचा खतरनाक डाव पुढे येणार?

by sachinsitapure

पुणे: Pune Lok Sabha Election 2024 | सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता ४ जून रोजी याबाबतची मतमोजणी असणार आहे. विविध यंत्रणेकडून या निकालाबाबतचे एक्झिट पोल प्राप्त होत आहेत. पुण्यात या निकालाच्या अगोदरच महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे (Vasant More) यांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात १३ मे रोजी मतदानप्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत उमेदवारांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, ” मला निवडणूक निकालाची धाकधूक अजिबात नाही. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लाट नाही. गेल्या दहा वर्षात भाजपने (BJP) विकासकामे केलेली नाही.

जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे जनता भाजपवर नाराज आहेत. पुणेकर नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. मी विजयी होणार आहे. जेजुरीला जाऊन मल्हार मार्तंड खंडोबारायाचे दर्शन घेऊन आलेलो आहे.”

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, “धाकधूक नाही, निकालाविषयी आत्मविश्वास आहे. पुणेकरांचा आशीर्वाद मला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात पुणे शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत.

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) भाजपची सत्ता होती. या सत्तेच्या काळात भाजपने कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे केली आहेत. मेट्रो, नदीसुधार, समान पाणी पुरवठा योजना यांसह विविध योजना राबविल्या असून त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. या विकास कामाच्या जोरावर मला विजयाची पूर्ण खात्री आहे.”

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे म्हणाले, ” मनसेत येण्यापूर्वी मी शून्यातून उभा राहिलो आहे. मनसे सोडल्यांनंतर मी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहे. माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही, मला निवडणुकीच्या निकालाचे टेन्शन नाही.

मी पुण्याचा खासदार होणार आहे. जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहे. त्यामुळे मला जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे.”

पुण्यात भाजपचे कमळ फुलणार, काँग्रेसचा पंजा भारी ठरणार की वसंत तात्यांचा खतरनाक डाव पुढे येणार यासाठी ४ जून च्या मतमोजणीची सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Posts