IMPIMP

Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढतेय; उपाययोजना राबवण्याची गरज

by sachinsitapure

पुणे: एखादा सण असो , उन्हाळी सुट्टी असो किंवा आठवड्याचा विकेंड असो पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी ठरलेलीच असते. मात्र सुट्टीचा दिवस नसतानाही बुधवारी (दि ३) अशीच गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्थानक ऑफ सीझनलाही फुल्ल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे २०० ते २३० च्या आसपास रेल्वेगाड्यांची ये-जा असते. त्याद्वारे येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अलीकडच्या काळात या प्रवाशांमध्ये वाढ होत असून स्थानकावर गर्दीचा प्रचंड ताण येत आहे. बुधवारी स्थानकाच्या तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या.

कोणताही सिझन नसताना प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. एका खिडकीवर नव्हे तर स्थानकावरील प्रत्येक खिडकीवर अशा प्रकारे रांगा दिसल्या. ऑनलाईन तिकीट व्यवस्था असतानाही अशा प्रकारे तिकीट खिडक्यांवर इतक्या रांगा कशा काय लागल्या? असा प्रश्न नक्कीच येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पडतो. यावरून आता पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्याबरोबर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील इतर स्थानकांचा विकास करण्याची गरज असल्याचे सातत्याने समोर येत आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. हडपसर आणि खडकी येथील टर्मिनलचा विकास करण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, ही पावले म्हणावी तितक्या वेगाने पडत नसल्याचे दिसत आहे.

परिणामी, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सातत्याने गर्दीचा आणि रांगेत उभे राहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्या संदर्भातील ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Posts