IMPIMP

Pune Rains | राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुण्यात गुरुवारी मान्सून दाखल होणार

by sachinsitapure

पुणे: Pune Rains | देशभरात काल लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या मतमोजणीला काही भागात वरुणराजानेही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. काल पुण्यात पावसाने अखेर हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार , मान्सून केरळपासून पुढे सरकला असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज राज्यासह पुण्यात देण्यात आला आहे. (Monsoon Rain In Pune)

” मान्सून गोव्यात पोहोचला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, पुण्यामध्ये दि ६. गुरुवारी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तर तो मुंबईत ९ जूनला पोहोचेल. तीन दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.” असे डॉ. अनुपम कश्यपी, जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ यांनी सांगितले आहे. (Monsoon Updates)

पुण्यात काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील, बिबवेवाडी, धनकवडी, घोरपडी, मार्केट यार्ड, शिवाजीनगर, एरंडवणा, सातारा रोड, स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, सिंहगड रोड, कर्वेनगर आदी भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.

शहरभर पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Related Posts