IMPIMP

SPPU News | हरिनाम, टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यापीठ दुमदुमले ! पुणे विद्यापीठाच्या ‘जलसंवर्धन दिंडी’चे पंढरपूरकडे प्रस्थान

by sachinsitapure

पुणे : SPPU News | टाळ मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन अन् मुखी हरिनामाचा जयघोष करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘जलसंवर्धन दिंडी’ने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान केले. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते या दिंडींचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी प्र – कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्रीमती बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य श्री. प्रसेनजीत फडणवीस, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, भाषा व साहित्य प्रशाळेचे संचालक प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांच्यासह विविध जिल्ह्याचे रासेयो समन्वयक तसेच दिंडीत सहभागी होणारे विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, आजच्या या वैज्ञानिक युगात मानवी मूल्यांचे पतन होत आहे. मात्र वारीमुळे आपल्यात पुन्हा एकदा मानवी मूल्य शिकण्याची, ती रूजवण्याची संधी मिळत असल्याचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी म्हणाले. तसेच वारीत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असतात. मात्र त्यांच्यात कुठलीही स्पर्धा नसते कारण ते निर्मळ मनाने एकत्र येत असतात. आपल्यालाही एवढं निर्मळ होता आलं पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी कुलगुरू आणि इतर उपस्थित मान्यवर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून मुख्य प्रवेशदारापर्यंत दिंडींत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर ठेकाही धरला. याप्रंसगी विविध मान्यवरांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या दिंडींच्या नियोजन पुस्तीकेचे प्रकाशनही करण्यात आले.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी ‘स्वच्छ वारी- स्वच्छ वारी- निर्मल वारी- हरित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यांतंर्गत आषाढी वारीनिमित्त पुणे ते पंढरपूर दरम्यानरासेयोद्वारे विविध सामजिक विषयांवर आधारित दिंडी काढली जाते. विद्यापीठाच्या दिंडीचे हे २० वे वर्ष आहे. यावर्षी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील १६० स्वयंसेवक या दिंडीत सहभागी झाले आहेत. हे विद्यार्थी जल संवर्धन, पर्यावरण संवर्धन, लोकशाही बळकटीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य, भारुड या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत.

Related Posts