IMPIMP

Vasant More On Bahujan Vanchit Aghadi Voters | ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचे ठरल्यावर वसंत मोरेंचा आरोप; म्हणाले – ‘वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही’

by sachinsitapure

पुणे : Vasant More On Bahujan Vanchit Aghadi Voters | मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. परंतु, वसंत मोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. आता मोरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena UBT) जाणार आहेत. ९ जुलैला त्यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. तत्पूर्वी, प्रतिक्रिया देताना वसंत मोरे यांनी वंचितवर आरोप केला आहे. वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही, असे मोरे यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना वसंत मोरे यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असे ठरवले होते. त्यात माझी प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली. त्यावेळी मला संघटनेची सोबत असणे गरजेचे होते. वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहरात चांगले काम करता येईल अशी असे वाटत होते. परंतु वंचितमध्ये जे यश मिळायला पाहिजे होते तसे मिळाले नाही. वंचितच्या मतदार, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारले नाही.

वसंत मोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतला त्यात अशा काही गोष्टी पुढे आल्या, मराठा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहण्यात आले. तर मराठा मतदारांनीही वंचितचा उमेदवार म्हणून मला स्वीकारले नाही. माझ्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे मी ९ जुलैला मातोश्रीवर जात पक्षप्रवेश करणार आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली.

वसंत मोरे म्हणाले, वंचितच्या ठराविक कार्यकर्त्यांनी माझे काम केले. सरसकट सगळ्यांना म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी मला वेळ दिला. मतदारांची विभागवार पाहणी केली, वंचितचा मतदार आहे त्याठिकाणी मतदान झाले नाही. त्याठिकाणी लोकांनी काँग्रेसला स्वीकारले.

ते पुढे म्हणाले, आगामी महापालिका, विधानसभा पाहता कार्यकर्त्यांचा कल घेतला. या भागात शिवसेनेचा मी सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहे.

वसंत मोरे म्हणाले, माझ्यासोबत जे खरे वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांना माझ्याविरोधात बोलणारे कार्यकर्ते कुठे होते हे माहिती आहे. बाळासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी ताकद वापरावी. उगाच काहीतरी करायचे त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअपवर पोस्ट करायची त्यातून पोलिसांवरचा ताण वाढतो.

मी बाळासाहेब आंबेडकरांना स्वत: मेसेज केला. २०१८ ला वंचितची स्थापना झाली, ज्यांच्या खांद्यावर पुण्याची जबाबदारी दिली, त्यांनी संघटना वाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. ही खदखद वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. संघटना वाढीसाठी फेरबदल करावा असे मी प्रकाश आंबेडकरांना म्हटले होते.

शिवसेनेतील प्रवेशाबाबत वसंत मोरे म्हणाले, मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून शिवसेनेत प्रवेश करत नाही. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी योग्यरित्या पार पाडेन. पुणे शहरात माझ्या पक्षप्रवेशानंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल.

Related Posts