IMPIMP

ACB Trap Case | रेती टिप्पर सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी, तहसिलदार, नायब तहसीलदारासह तीन जण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
Pune ACB Trap News

गोंदिया :  – ACB Trap Case | जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या गोरेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार व एका खासगी व्यक्तीला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.7) सायंकाळी गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी गोरेगाव तालुक्यातील तेढा गावातील 40 वर्षीय व्यक्तीने गोंदिया एसीबीकडे तक्रार केली आहे. (Gondia Bribe Case)

गोंदिया पोलिसांनी तहसीलदार किसन कचरू भदाणे Kiran Kachru Bhdane (वय ५० रा. बँक कॉलनी गोंदिया, जि. गोंदिया कायमचा पत्ता मु. पो. राउड ता. चांदवड जि. नाशिक), नायब तहसीलदार ज्ञानेश्वर रघुजी नागपुरे Dnyaneshwar Raghuji Nagpure (वय ५६ रा. गोरेगाव. जि. गोंदिया), खाजगी इसम संगणक ऑपरेटर राजेंद्र गोपीचंद गणवीर Rajendra Gopichand Ganveer (वय ५२ वर्ष रा. घुमरा ता. गोरेगाव जि. गोंदिया) असे गुन्हा दाखल केलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार व त्यांचा मित्राचा बिल्डिंग मटेरिअल सप्लाय करण्याचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे प्रत्येकी एक टिप्पर आहेत. ०४ मार्च २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास दोन्ही टिप्पर मधुन प्रत्येकी २ ब्रास वाळू वाहतूक करताना मौजा गिधाडी शिवारात मंडळ अधिकारी व पथकाने दोन्ही टिप्पर पकडले. पकडलेले टिप्पर तहसील कार्यालय गोरेगाव येथे जमा केले. तहसिलदार किसन भदाणे याने तक्रारदार व त्यांचा मित्र यांना एक ब्रासचे चालान भरण्यास सांगितले. त्यावरून ०६ मार्च २०२४ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी प्रती वाहन प्रमाणे १ लाख २३ हजार ८८३ रुपयांचे चालान बँकेत भरले. त्याच्या पावत्या घेऊन तहसील कार्यालय गोरेगाव येथे गेले असता त्यांना टिप्परच्या चाव्या न मिळाल्याने ते त्यांच्या गावी निघून गेले. गावातील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने तक्रारदार यांना भेटून सांगितले की, तुमचे टिप्पर सोडण्यासाठी व या पुढे वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रती वाहन ५० हजार रुपये या प्रमाणे दोन्ही वाहनांचे एक लाख रुपये हे किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव यांना द्यावे लागतील असा निरोप दिला. तक्रारदार यांनी याबाबत गोंदिया एसीबीकडे तक्रार केली.

लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी दंडाच्या रकमेचे चालान भरलेले असताना देखील तहसीलदार किसन भदाणे याने जप्त वाहने सोडण्याकरीता ‘आणखी एक चालान भरा’ अशी कार्यालयीन कामकाजाची भाषा द्विअर्थी वापरून जप्त दोन्ही वाहने सोडण्यासाठी एक लाख रूपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली.

सापळा कारवाई दरम्यान तहसिलदार किसन भदाणे याने लाचेची रक्कम खाजगी इसम संगणक ऑपरेटर राजेंद्र गणवीर यांच्याकडे देण्यास सांगितले. खाजगी इसमाने तक्रारसोबत असलेल्या पंचाकडे चौकशी केली असता त्यास पंचाबाबत संशय आल्याने लाच स्विकारली नाही.

तक्रारदार व त्यांचा मित्र यांच्या टिप्पर मध्ये प्रत्येकी २ ब्रास वाळू असताना व प्रत्येकी 2 ब्रास वाळू सह वाहने जप्त केल्याबाबतचे पंचनामे मंडळ अधिकारी व पथकाने तहसिलदार किसन भदाणे यांना सादर केले. आरोपींनी संगनमताने जप्त केलेली वाहने ही २ ब्रास रेती असलेले टिप्पर नसुन त्यामध्ये एक ब्रास रेती होती, असे दाखवण्याकरीता इंडेमनेटी बाँड तयार करताना वाहन हे ट्रॅक्टर असल्याचे नमूद करून बनावट कागदपत्रे तहसील कार्यालयात तयार केले. तसेच नायब तहसीलदार ज्ञानेश्वर नागपुरे याने तक्रारदारास इंडेमनेटी बाँड तयार करून देण्यास मदत केल्याच्या मोबदल्यात पार्टी देण्याची मागणी केली.

तहसिलदार, नायब तहसिलदार व खाजगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरूद्ध गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील तहसीलदार ज्ञानेश्वर नागपुरे याला यापूर्वी ठाणे येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना १० लाख रुपये लाच स्वीकारल्या बाबत सन २०१७ मध्ये ठाणे नगर पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया एसीबीचे पोलीस उप अधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अतुल तवाड़े, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, पोलीस अंमलदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, चालक दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली.

Related Posts