IMPIMP

Ajit Pawar In Baramati Sabha | सख्ख्या पुतण्यालाही अजितदादांनी सोडले नाही, म्हणाले ”अरे, कुस्तीचा डाव माहितीय का बेटा? आयुष्यात कुस्ती खेळले नाही अन…”

by sachinsitapure

बारामती : Ajit Pawar In Baramati Sabha | काही-काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे, कुस्तीचे डाव माहिती आहे का बेटा? घुटनाचीत कशाला म्हणतात? कुठल्या डावाला काय म्हणतात? चीतपट कशाला म्हणतात? उगीच आम्ही बोलत नाही, त्याच्यामुळे काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करु लागलेत. तुम्ही फार वरती उड्या मारु नका, हे औट घटकेचं आहे, अशी घणाघाती टीका अजित पवार यांनी त्यांचे सख्ख्ये पुतणे आणि बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यावर केली. ते बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. (Baramati Lok Sabha)

अजित पवार म्हणाले, बारामतीकरांनो लक्षात ठेवा, हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे गरा-गरा-गरा फिरतायत ना, हे ८ तारखेला कुठं निवांत जातील बघा. परत दर आठवड्याला अजित पवार, तुम्ही आणि मी एवढंच आहे.

मोदी सरकारची बाजू मांडताना अजित पवार म्हणाले, ३७० कलम रद्द केलं काय चुकलं. या देशातील नागरिकाला कोणत्याही राज्यात जमीन घेण्याचा अधिकार नाही का, तो अधिकार दिला. लोकं म्हणत होती, दंगली होतील, काही झालं नाही. यांनीच यांचं दुकान चालवण्यासाठी काहीतरी पुड्या सोडायच्या आणि मताची पोळी भाजून घ्यायची. काहींचं हे अशा पद्धतीचं राजकारण आहे.

अजित पवार म्हणाले, खरं काय खोटं काय,समजून घ्या, भावनिक होऊ नका. त्यासाठी मतदान करताना मशीनवर पहिलं नाव सोडायचं दुसरं पकडायचं, सुनेत्रा अजित पवार नावाच्या पुढे घड्याळ आहे, त्याच्या पुढचं बटण दाबून लोकसभेवर पाठवायचं, असे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केले.

तर सुप्रिया सुळेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले, काही म्हणतात, महिला लोकसभेत गेल्यावर त्यांचा नवरा पर्स घेऊन जाणार मागं, मागं. आता अजित पवार काय पर्स घेईल का? अरे काय? मग आता सदानंद सुळे पर्स घेऊन जातात का? मला तर एकेकाला अशी उत्तरं देता येतील, पळता भुई थोडी होईल, थेट मुंबई गाठाल, दुसरं कुठे थांबणार नाही. पण मी म्हणतो, जाऊ दे आपलेच आहेत, म्हणून मी शांत राहतो.

Related Posts