IMPIMP

Baramati Lok Sabha Election 2024 | पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारमतीत अनुचित प्रकार घडला तर…; सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र

by sachinsitapure

बारामती : – Baramati Lok Sabha Election 2024 | राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या पवार कुटुंबातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 11 मतदारसंघात मंगळवारी (दि.7) तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघातील मतदानाची तयारी प्रशासकीय स्तरावर पूर्ण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली असून मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची मागणी मविआचे उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिष्ठा या लढतीतून पणाला लागली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्र संवेदनशील असून त्या मतदान केंद्रावर गैरप्रकार होऊ शकतो. त्यामुळे अशा मतदान केंद्रांवर खबरदारीचे उपाय योजण्यात यावेत अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या संवेदनशील बुथवर काही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असंही त्यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. सुप्रिया सुळेंनी ई-मेलच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे.

विशेष म्हणजे बारामती मधील जी मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा दावा करण्यात आलाय, त्या मतदान केंद्रांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 72 हजार 668 मतदार आहेत. मतदान केंद्रावर आजच मतपेट्या पोहचवल्या जाणार आहेत. 380 मतदान केंद्र बारामती तालुक्यात आहेत. तर बारामती तालुक्यातील तीन हजार कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत.

सुप्रिया सुळेंच्या तक्रारीत दावा

बारामती शहर – 12
बारामती ग्रामीण- 47
दौंड – 33
पुरंदर- 31
भोर 31
खडकवासला- 3

बारामती मतदारसंघातील हे मतदान केंद्र संवेदनशील असल्याने येथे अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे, तब्बल 157 मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्याची व खबरदारीचा उपाय म्हणून काम करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Related Posts