IMPIMP

Pankaj Jawale Bribe Case | अहमदनगर महानगरपालिकाआयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, ACB च्या कारवाईनंतर आयुक्त पंकज जावळे फरार

by sachinsitapure

जालना : – Pankaj Jawale Bribe Case | अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे (वय- 47 मूळ रा.माजलगाव जि.बीड सध्या रा. शासकीय निवासस्थान, अहमदनगर) यांच्यावर जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं घर व महापालिकेतील दालन सील केले आहे. लिपिक तथा महापालिका आयुक्त स्विय सहायक शेखर देशपांडे (वय-48 रा. अहमदनगर) याच्यामार्फत 8 लाखांची लाच मागितली होती. एसीबीच्या पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तासह लिपिक फरार झाले आहेत. याप्रकरणी एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांचा शोध सुरु केला आहे. एक बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Commissioner Bribe Case)

याबाबत 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने 19 व 20 जून रोजी पडताळणी केली होती. बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 9 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. या कारवाई बाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह 4K रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. या प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे 18 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता.

या परवानगीसाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हे लिपिक देशपांडे यांच्या मार्फत 9 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना डॉ. जावळे आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे 19 जून 2024 रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांच्या तक्रारी वरून 19 व 20 जून रोजी लाच मागणी पडताळणी केली.

शेखर देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8 लाख रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केली.

Related Posts