IMPIMP

Rohit Pawar In Baramati Sabha | बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवार भावूक, अजित पवांरांनी उडवली खिल्ली (Video)

by sachinsitapure

बारामती :  – Rohit Pawar In Baramati Sabha | तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी सात मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात अटीतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Lok Sabha) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान, आजच्या सुपर संडेला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून तुफान प्रचार करण्यात आला. शेवटच्या प्रचारसभेला दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. एवढंच नाहीतर रोहित पवार भावूक झाले, तर अजित पवारांनी यावरुन त्यांची खिल्ली उडवली. (Baramati Lok Sabha)

काय म्हणाले रोहित पवार?

सुप्रिया सुळेंसाठी आज बारामती मध्ये प्रचाराची सांगता सभा घेण्यात आली. त्यावेळी रोहित पवारांनी तुफान भाषण केलं. पण भाषण करताना ते भावूक झाल्याचं दिसले. रोहित पवार म्हणाले, जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो. साहेब टीव्हीकडे पाहत होते, चेहऱ्यावर त्यांनी दाखवलं नाही. टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले आणि त्याचे त्यांनी उत्तर दिले. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तो घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे. जोपर्यंत नवी पिढी ती जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते.

असं बोलत असताना रोहित पवार भावूक झाले. थोडावेळ त्यांनी हुंदका आवरला आणि आवंढा गिळला. पण शेवटी डोळ्यातून आश्रू आलेच. डोळ्यातील अश्रू पुसत ते म्हणाले, साहेब मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे जे काही वक्तव्य केलं ते कृपा करुन करु नका. तुम्ही आमचा जीव आहात. तुम्ही आमचा आत्मा आहात. मोठे नेते कितीही तुमच्याबरोबर असले तरीही सामान्य जनता आणि छोटे कार्य़कर्ते तुमच्याबरोबर आहे.

रोहित पवारांची अजित पवारांनी उडवली खिल्ली

रोहित पवारांचं हे भाषण सुरू असताना सुनेत्रा पवारांसाठी बारामती येथे अजित पवार गटाची सभा सुरू होती. रोहित पवारांच्या भावूक होण्याचा व्हिडिओ अजित पवारांपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या सांगता सभेत रोहित पवार यांची खिल्ली उडवली.

अजित पवार म्हणाले, शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं मी सांगितलं होतं. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मी ही दाखवतो. मलाही मतदान करा, असं म्हणत अजित पवारांनी आधी कार्यकर्त्यांना मिश्किलीत डोळा मारला, खिशातील रुमाल काढला आणि डोळ्यांना लावला. ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही कामे दाखवा. तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालत, असं अजित पवार म्हणाले.

Related Posts