IMPIMP

Sharad Pawar | “यावेळी आम्ही ठरवलंय महाराष्ट्राचे सरकार काही झाले तरी हातात घ्यायचे, मग बघू…”; शरद पवारांचे सुपे येथे वक्तव्य

by sachinsitapure

सुपे : Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीच्या निकालाने (Lok Sabha Election) शरद पवारांनी राज्यातील राजकीय गणितं बदलून टाकली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) रणशिंग पवारांनी फुंकले आहे. यंदा राज्यात आपले सरकार बनवायचे असल्याचे ते जनतेला सांगत आहेत. काल इंदापूरच्या दौऱ्यात चार पाच महिन्यात हे सरकार बदलायचे असल्याचे भाष्य त्यांनी केले होते.

“यावेळी आम्ही ठरवलंय महाराष्ट्राचे सरकार (Maharashtra Govt.) काही झाले तरी हातात घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी, कांदा व दुधाच्या दराचा प्रश्न कसा सुटत नाही ते बघू. आता तुम्ही विधानसभेसाठी काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका “, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुपे (ता. बारामती) येथे दिली. आगामी निवडणूकीत राज्याचे सरकार आमचेच असेल असा निर्धार त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

निवडणूकीत कोणते बटण दाबायचे हे कतृत्व तुम्ही दाखवले. तुम्ही तुमचे काम केले. आता तुम्ही विधानसभेचे काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका, असे सांगून पवार म्हणाले आज खासदार सुप्रिया सुळे येणार होत्या, पण कौटुंबिक महत्वाच्या कामामुळे बाहेरगावी गेल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. त्या यथावकाश आपल्या भागाला भेट देतील व तुमच्या कामात लक्ष घालतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

पुढे पवार म्हणाले , “जनाई योजना मंजूर करण्याचा अधिकार माझ्याकडे होता. काही ठिकाणी जमिनीच्या अडचणी आल्या तर काही भागात कालवे झाले नाही. योजनेचा फायदा काही भागाला झाला तर काही भाग वंचित आहे. चाऱ्यांची कामे अपुरी आहेत. आवर्तन वेळेवर मिळत नाही. ही अर्धवट कामे झाली. त्याची पूर्तता करून घ्यावी लागणार आहे. आता सुप्याकडे येताना कारखेल, देऊळगावरसाळ या गावाहून आलो. आज माझ्याकडे निवेदने आली तीत पाण्याची निवेदने अधिक आहेत. जनाई-शिरसाई योजनेद्वारे तलाव भरावेत. पाईपलाईन करावी तर काहींच्या मते करू नये अशा मागण्या आल्या आहेत.

तालुक्यातील शिर्सुफळ,उंडवडीसुपे व सुपे येथे पवार यांचा जनसंवाद दौरा होता. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी तरूण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, तालुकाध्यक्ष ऍड.एस.एन.जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, वनिता बनकर, हनुमंत चांदगुडे, सचिन लडकत, महादेव भोंडवे आदींसह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts