IMPIMP

Shirur Pune News | अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा! शिरूर लोकसभा पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांची खदखद; भाजपकडून पराभवाचे विश्लेषण

by sachinsitapure

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – शिरूर लोकसभा मदारसंघातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे(अजित पवार गट)उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभावाचे चिंतन करण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप पक्षाकडून विश्लेषण चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही चिंतन बैठक माजी मंत्री तथा भाजपचे शिरूर लोकसभा निरीक्षक सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती.

शिरूर लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव,त्याची कारणे आणि आगामी काळातील रणनीतीसंदर्भात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिरूर लोकसभेसाठी आपला उमेदवार चुकला असल्याची खदखद बोलून दाखवली,तर निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा देखील काहींनी बोलून दाखवले,अजित पवार यांना महायुतीत घेण्यावरून काही कार्यकर्त्यांनी आपली रोखठोक नाराजी व्यक्त केली याच नाराजीत एका लोकप्रतिनिधीनी देखील कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवत आम्ही देखील समदुखी असल्याचे बोलून दाखवले.

झालेल्या चुका सुधारत विधानसभेबाबत देखील चर्चा झाली. यावेळी विधानसभेच्या उमेदवारी वरून देखील खदखद व्यक्त करण्यात आली आज पर्यंत कोणाची उमेदवारी घोषित झालेली नाही आणि कोणी ती फायनल समजू नये.पक्ष देईल तो उमेदवार असेल.शिरूर-हवेली मध्ये स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे त्यांचे योगदान देखील आपणास विसरून चालणार नाही त्यांच्या कुटुंबाला डावलने पक्षाला महागात पडेल असे देखील खदखद काहींनी व्यक्त केली अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पदाधिकारी दिली.
एकंदरीत शिरूर लोकसभेमधील काही पदाधिकाऱ्यांचा अति आत्मविश्वास नडल्याचे देखील दिसून आले.

या बैठकीला शिरूर लोकसभेचे विश्लेषक तथा माजी मंत्री सुभाष देशमुख, दौंडचे आमदार राहुल कुल,माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मतदारसंघात मेहनत घेत आहे,पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल घ्यावी आणि विधानसभेला आयाराम गयारामांना संधी देण्याऐवजी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या निष्ठावंतांचा विचार करण्यात यावा; अन्यथा विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभे प्रमाणे चित्र राहील.असा विश्वास काही कार्यकर्त्यांनी खाजगीत बोलून दाखवला.

Related Posts