IMPIMP

Smriti Irani | स्मृती इराणी होणार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष?

by sachinsitapure

दिल्ली: Smriti Irani | भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचा कार्यकाळ संपलेला आहे. नड्डा यांची सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षात जोरदार विचारमंथन सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर पक्षीय पदांना घेऊन बदल केले जात असतात. (BJP New President)

मोदी सरकारने (Modi Govt) गेल्यावर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला विधेयक पारित केले होते. या विधेयकानुसार, राज्य विधीमंडळ आणि संसदेत महिलांचे प्रतिनिधीत्व एकूण संख्येच्या एक तृतीयांश इतके वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांमध्ये अधिकाधिक महिलांना संधी दिली जाणार आहे. त्याची सुरूवात भाजपच्या पक्ष संघटनेतून केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पक्ष संघटनेतही महिलांना अधिकार देण्याच्या उद्देशाने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर देखील पहिल्यांदाच एका महिलेची निवड केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती आहे.

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पारंपारिक अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत स्मृती इराणी यांना गांधी घराण्याचे विश्वासू सहकारी किशोरीलाल शर्मा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा बदला घेण्यासाठी स्मृती इराणी यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्याचा भाजपचा विचार आहे. इराणी यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास पहिल्यांदाच एका महिलेला हा मान मिळू शकणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार फटका बसल्यामुळे या दोन्ही राज्यांत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे काम सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सध्याच्या कार्यकारिणीत बदल करून नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. राज्य विधानसभा व लोकसभेत महिलांचे प्रतिनिधीत्व वाढविण्याबाबत भाजपने गंभीरतेने विचार सुरू केला आहे.

Related Posts