IMPIMP

BJP On Nawab Malik | अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी; भाजपकडून प्रतिक्रिया, म्हणाले, ” आमची तीव्र … “

by sachinsitapure

मुंबई: BJP On Nawab Malik | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल (दि २) पार पडली. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. भाजपाकडून मलिक यांच्या महायुतीतील (Mahayuti) प्रवेशाला जाहीर विरोध केलेला असताना अजित पवारांनी मलिकांना बैठकीस बोलवल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

” नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. हे मान्यच आहे परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो” असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते. हे पत्र सार्वजनिक करण्यात आल्याने अजित पवार काहीसे नाराजही झाले होते. मात्र त्यानंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र काल पार पडलेल्या बैठकीस नवाब मलिक उपस्थित असल्याने महायुतीत वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

याबाबत भाजपकडून प्रतिक्रिया आलेली आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, ” नवाब मलिक जर राष्ट्रवादीच्या बैठकीला गेले असतील तर आमची पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त करतो. जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे तीच भूमिका आजही कायम आहे. नवाब मलिक यांना कोणत्याही परिस्थितीत महायुतीत स्थान देता येणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यात कोणताही बदल होणार नाही”, अशी भूमिका आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी व्यक्त केली.

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपले समर्थन दिले होते. तसेच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र गंभीर आरोप असलेले मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिले होते.

Related Posts