IMPIMP

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना ‘लाडकी बहीण’ काय समजणार?; मुख्यमंत्र्यांकडून हल्लाबोल

by sachinsitapure

मुंबई : CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची (Mazi Bahin Ladki Yojana) घोषणा नुकतीच अधिवेशनात करण्यात आली. या घोषणेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे पाहायला मिळाले. या योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. जशी बहिणींसाठी योजना आणली तशी योजना भावांसाठीही आणा असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते.

त्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून समाचार घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” माता भगिनींचा सन्मान करणं ही आपल्या राज्याची संस्कृती आहे. काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजना आणली. भावाचे काय? ज्यांना सख्खा भाऊ समजला नाही. त्यांना योजना तरी कशी कळणार?, असा टोला लगावतानाच ज्या घरातली लक्ष्मी सुखी, त्या घरात समृद्धी पक्कीच समजा.

आपण मुलींचं संपूर्ण उच्च शिक्षण मोफत करणार आहोत. आपण कुणाला काही द्यायचं ठरवलं तर यांच्या पोटात दुखू लागतं. त्यांना द्यायची माहिती नाही. त्यांचं मन निर्मळ नाही. नाही निर्मळ मनं, काय करेल साबणं “, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

“आम्ही जनतेला काही द्यायचं ठरवलं तर विरोधकांच्या पोटात का दुखतं? तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका करू नका. आम्ही माताभगिनींना घरचा आहेर दिला आहे. लाडक्या बहीण योजनेत एखाद्या व्यक्तीने भगिनींकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला सस्पेंड केलं जाईल. कोणी असं केलं तर त्याला तुरुंगात टाकू “,असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ १ जुलैपासून सुरू केली. या योजनेसाठी २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला पात्र असणार आहेत. मध्यप्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवली जात आहे.

Related Posts